|| सागर नरेकर

चार तासांची मोकळीक शेतकऱ्यांना सोयीची, रोजगारही वाचला

ठाणे: गेल्या वर्षात करोनाच्या संकटात लागू केलेल्या देशव्यापी कडक टाळेबंदीमुळे ग्रामीण अर्थचœ थांबले होते. परिणामी शेतकऱ्यांसह मजूर-कामगार, व्यापारी, दुकानदार, उपहारगृह मालकांची कोंडी झाली होती. यंदाच्या राज्य शासनाने लागू केलेल्या टाळेबंदीत विविध प्रकारची मोकळीक मिळाल्याने जिल्ह्यातल्या शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा नियोजन, वन विभाग आणि पावसाळापूर्वीची कामे सुरू असल्याने मजुरीचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे गोरगरिबांची गेल्या वर्षात झालेली फरफट यंदा रोखण्यात यश आले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्य शासनाने १३ एप्रिल रोजी टाळेबंदीची घोषणा केली. गेल्या वर्षात केंद्र शासनाने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे ज्या ज्या वर्गाचे हाल झाले अशा सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्याने टाळेबंदीची घोषणा करत असताना केला. या टाळेबंदीत सकाळी ७ ते ११ या चार तासांत जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीला मुभा दिली आहे. गेल्या टाळेबंदीत ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. शेतकऱ्यांसह मजूर, कामगार, विशेषत: आदिवासी बांधवाना त्याचा मोठा फटका बसला होता. मात्र यंदा जिल्ह्यातील शेतीची कामे, त्यासंबंधीची दुकाने सुरू असल्याने शेतीची काम बिनदिक्कतपणे सुरू आहेत. कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असल्याने विटभट्टी मजूरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षात मुरबाड, शहापूर तालुक्यात काम आणि मदतीअभावी विटभट्टी कामगारांचे मोठे हाल झाले होते. गेल्या काही  महिन्यात जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने गावागावांमध्ये काही कामे सुरू आहेत. त्यातून रोजगार उपलब्ध झाल्याने मजुरांचे हाल थांबले आहेत. वनहक्क दावे निकाली निघाल्याने वनक्षेत्रात आदिवासी बांधवांकडून पावसाळ्यापूर्वीची कामे, फळे गोळा करणे अशी कामे सुरू आहेत. वन विभागाच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांनाही ग्रामीण भागात गती मिळाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या कामांमधून मजुरांना कामे मिळत आहेत. त्याचा थेट दिलासा त्यांना टाळेबंदीत मिळाला आहे.

संचारबंदी असल्याने वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातला माल विकण्यावरही निर्बंध आले होते. यंदा ही समस्या नसल्याने मुरबाड, शहापूर, अंबरनाथ या तालुक्यांमधून कल्याण, बदलापूर या शहरांमध्ये भाजीपाला वाहतूक अविरत सुरू आहे. त्यासोबतच सुकी मासळी, शेतीपूरक उôोगातून आलेली उत्पादने यांचीही विक्री करता येत असल्याने ग्रामीण शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

व्यापारी, दुकानदार अडचणीत

अत्यावश्यक सेवेतील दुकानांशिवाय इतर दुकानांना परवानगी नसल्याने हे व्यापारी आणि दुकानदार अडचणीत आले आहेत. उपहारगृह, महामार्गावरील हॉटेल बंद असल्याने त्यांनाही आर्थिक नुकसान सोसावे लागते आहे. लग्न सराईत भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानदारांचा हंगाम बुडतो आहे.

यंदाच्या टाळेबंदीत मजूर घरात अडकून पडलेले नाहीत. विटभट्टी, शेतातील कामे सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे. मजुरांना वन विभागाची अनेक कामे मिळत असल्याने रोजगाराचा प्रश्न तितकासा गंभीर नाही. – इंदवी तुळपुळे, श्रमिक मुक्ती संघटना, मुरबाड.