जलयुक्त शिवार योजनेत ठाणे जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद असून खासगी कंपन्या, सेवाभावी संस्था, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, सामाजिक संस्था, शासकीय कर्मचारी अशा सर्वांनीच जलयुक्त शिवारसाठी एक दिवस श्रमदान करून लोक चळवळीचा नवा आदर्श उभा करून जिल्हा सुजलाम सुफलाम करूया, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण आणि पोलिस संचलनाप्रसंगी ते बोलत होते.

साकेत येथील पोलिस मैदानावर आयोजित या समारंभात विकासाच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य केलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा तसेच उल्लेखनीय सेवा बजावलेले पोलिस आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा  शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलिस आयुक्त परमबीर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आ. रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते अनंत तरे, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून शासनाने निश्चित केलेल्या गावांव्यतिरिक्त अन्य गावांमध्येही जलसंवर्धनाची कामे हाती घ्यावी लागतील. त्यासाठी खासगी कंपन्यांच्या सीएसआरची मदत घ्या, असे सांगत शिंदे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने एक दिवस जलयुक्त शिवारासाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले. सर्वांनी आपले योगदान दिल्यास लोक सहभागाची मोठी चळवळ उभी राहिल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्याला पावसाचे वरदान असून पावसाचे हे पाणी अडवल्यास शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात पिके घेता येतील आणि शेतकरी संपन्न होईल, असे ते म्हणाले.

जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्याला स्वत:च्या हक्काचे धरण अत्यावश्यक आहे, असे सांगत धरण विकसित करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहापूर तालुक्यातील गावपाड्यांसाठी भावली धरणातून पाणी आणण्याची योजना शासनाने मंजूर केली असून २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या योजनेमुळे शहापूर तालुक्यातील गावपाडे कायमचे दुष्काळमुक्त होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रो, जलवाहतूक, क्लस्टर डेव्हलपमेंट आदी विकासाच्या योजनांमुळे ठाणे जिल्ह्याचा चेहरामोहरा आगामी काळात बदलणार आहे. संपूर्ण एमएमआर प्रदेशात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याबरोबरच मेट्रोचे जाळेही उभारण्यात येणार आहे.  विकासकामांचा हा धडाका कायम ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय असला पाहिजे, असे ते म्हणाले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाके असून ठाणे जिल्ह्यात ही दोन्ही चाके एकाच वेगाने पळत असल्यामुळेच हा विकास शक्य होत आहे, याकडे लक्ष वेधत त्यांनी जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महापालिकांचे आयुक्त या सर्वांच्या कामाचे कौतुक केले. ठाणे पोलिसांनी गेल्या काही काळामध्ये मोठे गुन्हे उघडकीस आणल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ठाणे पोलिसांचे नाव झाले असून स्कॉटलंड यार्डनंतर आता ठाणे पोलिसांचेच नाव घ्यावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी पोलिस दलाचे कौतुक केले.