निवडणूक प्रचार कार्यकर्त्यांचा भाव वधारला

वसई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू असून सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांची रस्सीखेच सुरू आहे. त्यासाठी विविध आमिषे दाखवण्यात येत आहेत. काही पक्ष प्रचार करणाऱ्यांना दररोज ५०० रुपये देत आहे. त्याचबरोबर बिर्याणी, पुलाव, नाश्ता, चहा अशा प्रकारे पोटाचीही सोय लावून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे पेट्रोल महाग असतानाही काही पक्षांकडून कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून देण्यात येत आहे.

पालघर पोटनिवडणुकीत भाजप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, शिवसेना अशा मोठय़ा पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारासाठी पक्षाच्या मातब्बर नेत्यांच्या जाहीर सभा, लोकांच्या भेटीगाठी, प्रचारफेरी असे मार्ग अवलंबले जात आहेत. मात्र अधिक प्रमाणात नागरिक आपल्या पक्षाच्या प्रचारात सहभागी व्हावे यासाठी विविध फंडे अवलंबले जात आहेत. दिवसभर प्रचार केल्यास दररोज ४०० ते ५०० रुपये प्रचारकर्त्यांना दिले जात आहेत. दुपारी आणि रात्री जेवणाची सोयही पक्षाकडूनच केली जात आहे. त्याचबरोबर मध्ये नाश्टा आणि चहा यांची सोय करण्यात येत आहे. प्रचारकर्त्यांच्या दुचाकीत पेट्रोल टाकण्यासही मागेपुढे पाहिजे जात नाही. विशेष म्हणजे काही पक्षांकडून रात्रीच्या वेळेस मद्यपार्टीचेही आयोजन केले जात आहे.

आपल्यापासून कार्यकर्ते दूर होऊ  जाऊन नयेत किंवा अन्य पक्षांत जाऊ  नये, तसेच आपल्या पक्षात कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे हे प्रतिस्पध्र्याला दाखवण्यासाठी असे प्रकार सुरू झाले आहेत. काही कार्यकर्ते तर दुपारी एका ठिकाणी बिर्यानी खाऊन रात्रीच्या वेळी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मिसळून पुन्हा बिर्यानीचा आस्वाद घेण्याचे प्रकार सुरू आहेत.