01 March 2021

News Flash

पेट टॉक : महाराष्ट्रातील पशमी हाऊंड

परदेशी कुत्र्यांची भारतीय वातावरणाशी समतोल साधण्यासाठी जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे असते.

परदेशी श्वान काही प्रमाणात नाजूक असले तरी विशिष्ट गुणवैशिष्टय़ांमुळे भारतात परदेशी कुत्र्यांची आवड अधिक प्रमाणात वाढली.

पशमी हाऊंड
विविध श्वान प्रजातींमध्ये सध्या परदेशी कुत्र्यांना अधिक मागणी असली तरी काही भारतीय श्वान प्रजातींचे अस्तित्व विकसित होऊ लागले आहे. परदेशी श्वान काही प्रमाणात नाजूक असले तरी विशिष्ट गुणवैशिष्टय़ांमुळे भारतात परदेशी कुत्र्यांची आवड अधिक प्रमाणात वाढली. या परदेशी कुत्र्यांप्रमाणेच अनेक वर्षांपासून आपल्या गुणांमुळे लोकप्रिय असलेले भारतीय ब्रीड म्हणजे पशमी हाऊंड.. राजश्री शाहू महाराजांच्या काळात पशमी हाऊंड हे श्वान ब्रीड अस्तित्वात आल्याच्या काही नोंदी सापडतात. कोल्हापूर येथील संग्रहालयात काही छायाचित्रांमध्ये पशमी हाऊंड या श्वानाचे छायाचित्र पाहायला मिळते. शेतकऱ्यांचे लाडके असणारे हे पशमी हाऊंड शिकारी आणि राखणदारीसाठी अतिशय उपयुक्त ब्रीड आहे. दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक सीमा, लातूर, सांगली या ठिकाणी हे ब्रीड मोठय़ा प्रमाणात आढळते. इराणमधील सालुकी या श्वान ब्रीडशी काही प्रमाणात साधम्र्य असणाऱ्या पशमी हाऊंडची शरीरयष्टी उंच आणि काटक असल्याने साधारण भारतीय कुत्र्यांपेक्षा यांचे शारीरिक वेगळेपण जाणवते. खास करून शिकारीसाठी वापरले जाणारे हे कुत्रे डॉग शोजच्या लोकप्रियतेमुळे घरात पाळण्यासदेखील सुरुवात झाली आहे.
उंच, काटक शरीरयष्टी
पशमी हाऊंड या कुत्र्यांची शरीरयष्टी भारतीय कुत्र्यांप्रमाणे दिसत असली तरी कणखर शरीरयष्टी आणि उंची हे या कुत्र्यांचे वैशिष्टय़ आहे. जंगली भागात हे श्वान पालन करण्यासाठी उपयुक्त ठरते. शेताचे रक्षण करण्यासाठी पशमी हाऊंड या कुत्र्यांचा वापर करतात. जंगलाच्या बाजूला असणाऱ्या शेताचे इतर मोठय़ा प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी पशमी हाऊंड हे चपळ ब्रीड मानले जाते. रानडुक्करांच्या कळपाला पळवून लावण्याची धमक त्याच्यात असल्याने राखणेची उत्तम जाण या कुत्र्यांना आहे हे लक्षात येते.
भारतीय ब्रीड असल्याने खर्च कमी
परदेशी कुत्र्यांची भारतीय वातावरणाशी समतोल साधण्यासाठी जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे असते. मात्र हे ब्रीड मुळात भारतीय असल्याने बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. आजार जास्त होत नसल्याने या ब्रीडला सांभाळण्यासाठी खर्च कमी येतो. परदेशी कुत्र्यांमधील डॉबरमनपेक्षा अधिक क्षमतेने पशमी हाऊंड काम करतात. साधे खाणे योग्य प्रमाणात दिल्यास त्यांचा आहार संतुलित राहतो. कुत्र्यांच्या तयार अन्नापैकी शाकाहारी अन्न ३०० ग्रॅम तसेच मांसाहारी अन्न ३५० ग्रॅम या प्रमाणात दिल्यास योग्य प्रमाणात आहार त्यांच्या वाढीस उपयुक्त ठरतो.
जास्त व्यायामाची गरज
जास्त उंची हे पशमी हाऊंड या ब्रीडचे वैशिष्टय़ असल्याने साधारण ३० इंचापर्यंत या श्वान ब्रीडची उंची होते. मात्र जास्त उंची असल्याने या कुत्र्यांना व्यायामाची जास्त गरज जाणवते.

उच्च प्रशिक्षण उपयोगाचे नाही
अलीकडे घरात पाळण्यासाठीदेखील पशमी हाऊंडचा मोठय़ा प्रमाणात उपयोग होत असला तरी परदेशी कुत्र्यांप्रमाणे या कुत्र्यांना उच्च प्रशिक्षण उपयोगाचे नाही. हे कुत्रे हुशार असले तरी फारसे आज्ञाधारक नाहीत. त्यामुळे बॉम्बनाशक पथकामध्ये यांचा उपयोग केला जात नाही. घरातल्या सदस्यांशी हे कुत्रे जुळवून घेतात, मात्र रक्षण करणे हे यांचे कर्तव्य असल्याने परक्या व्यक्तींवर हल्ला करण्याची शक्यता असते.
शारीरिक वेगळेपण
हे ब्रीड कारवान हाऊंड यासारखेच दिसणारे असले तरी शारीरिक वैशिष्टय़ांमुळे हे ब्रीड वेगळे ठरते. या कुत्र्यांच्या कान आणि छातीकडच्या भागावर केसांचे कोटिंग असते, असे प्रशिक्षक सागर हर्शे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील असलेले हे ब्रीड परदेशात वितरित करण्यासाठी अनेक ब्रीडर प्रयत्नशील आहेत. परदेशी परीक्षकांकडून या ब्रीडला मोठय़ा प्रमाणात मागणी असते. पेण येथील प्रसाद मयेकर संपूर्ण भारतात वितरिण करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 12:22 am

Web Title: pashmi hound dog
Next Stories
1 इन फोकस : इथे पाणीकपात नाही!
2 प्रासंगिक : कुण्या देशाचे आले पाखरू
3 ठाणे परिवहन वाहकांच्या फसवेगिरीला लगाम
Just Now!
X