News Flash

लोकलसाठी पुलावर कल्याणकरांची गर्दी

कल्याण स्थानकात एकूण चार पादचारी पूल असून दोन पादचारी पूल हे अरुंद आहेत.

आगमन फलाट निश्चित नसल्याने तारांबळ; अरुंद पुलांवर चेंगराचेंगरीची भीती

आशीष धनगर, कल्याण

कल्याण रेल्वे स्थानकामध्ये लोकल गाडय़ांचे आगमन फलाट निश्चित नसल्यामुळे प्रवाशांची भलतीच तारांबळ उडत आहे. ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी लोकलचे प्रवाशी स्थानकातील अरुंद पुलावर उभे राहून गाडय़ांची वाट पाहता. स्थानकात लोकल येऊ लागताच ती गाठण्यासाठी प्रवाशांची पळापळ होत असल्याने या पुलावर चेंगराचेंगरी होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर, आगमन फलाट निश्चित नसल्याने वृद्ध नागरिक तसेच महिला व अपंग प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

मध्य रेल्वेच्या मार्गावरील कल्याण स्थानक हे सर्वात मोठे जंक्शन आहे. या स्थानकातून लोकल गाडय़ांची वाहतूक सुरू असते. याशिवाय, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ांचे थांबे आहेत. या स्थानकात दिवसभर प्रवाशांची कामानिमित्त वर्दळ सुरू असते. तसेच रात्रीच्या वेळेस एक्स्प्रेस गाडय़ांमुळेही प्रवाशांची वर्दळ सुरू असते. मात्र, या स्थानकांमध्ये लोकल गाडय़ा आणि एक्स्पेस गाडय़ा थांबण्यासाठी फलाटांचे योग्य नियोजन नसल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या स्थानकात लोकल आणि एक्स्प्रेस गाडय़ांसाठी एकुण आठ फलाट आहेत. मात्र, या गाडय़ांचे फलाट निश्चित नसून कोणत्याही फलाटावर गाडी येते. त्यामुळे प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी तारांबळ उडते. त्यामुळे प्रवासी स्थानकातील पुलावर उभे राहून लोकल गाडय़ांची वाट पाहतात. एखादी लोकल फलाटावर येत असल्याचे कळताच प्रवासी त्या फटालाच्या दिशेने धाव घेतात. त्यामुळे पुलाच्या जिन्यावर एकच गर्दी उसळते. अशा वेळी चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडण्याचीही भीती असते.

कल्याण स्थानकात एकूण चार पादचारी पूल असून दोन पादचारी पूल हे अरुंद आहेत. तर, स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या एका पुलाचे कर्जत दिशेकडील जिने हे दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. या सर्वच पादचारी पुलांवर प्रवासी लोकल गाडीची वाट पाहण्यासाठी उभे राहत असून या ठिकाणी प्रवाशांच्या गर्दीमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून ही ठोस उत्तरे मिळत नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.

होम फलाटावरही गोंधळ

कल्याण स्थानकात फलाट क्रमांक १ आणि १ ए हे दोन्ही होम फलाट असून या ठिकाणाहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सुटतात. मात्र, कधी कधी या ठिकाणाहून टिटवाळा दिशेकडे जाणारी लोकल सोडण्यात येते. त्यामुळे नेहमीच्या सवयीने ही गाडी पकडणाऱ्या मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना शहाड स्थानकावर उतरून उलटा प्रवास करावा लागतो.

कल्याण रेल्वे स्थानकात लोकल कधी कोणत्या फलाटावर येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी पादचारी पुलावरच वाट पाहणे सोयीचे ठरते. मात्र, या गोंधळामुळे पुलावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

– नरेंद्र जाधव, रेल्वे प्रवासी

कल्याण रेल्वे स्थानक लोकल गाडय़ा आणि एक्स्प्रेसच्या वाहतुकीसाठी अधिक व्यस्त स्थानक आहे. त्यामुळे येथून अनेकदा गाडय़ा विलंबाने धावतात. त्यामुळे स्थानकात गाडी आल्यावर जो फलाट उपलब्ध असेल, तेथे गाडी थांबवण्यात येते. त्यानुसारच लोकल थांबविण्याचे नियोजन करण्यात येते.

– अनिल कुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 4:05 am

Web Title: passenger waiting for local train on bridge at kalyan station
Next Stories
1 मेव्हण्याच्या हत्येचा कट
2 मंगल कार्यालयांवर चोरटय़ांची वक्रदृष्टी
3 बांधकामे अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू
Just Now!
X