रेल्वे अर्थसंकल्पातून प्रवाशांच्या अपेक्षा
जागतिक दर्जाचे ठाणे स्थानक, ठाणे-कल्याण-कर्जत शटल सेवा, वायफाय सुविधा, वातानुकूलित नव्या कोऱ्या उपनगरीय गाडय़ा, वेगवान प्रवास, ठाकुर्ली टर्मिनन्स, कल्याण-वाशी मार्ग अशा एक ना अनेक घोषणांची सरबत्ती यापूर्वीच्या रेल्वे अर्थसंकल्पातून ठाणेकरांवर झाली आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नव्या घोषणा करण्यापेक्षा यापूर्वी दिलेल्या घोषणांची पूर्तता तेवढी करा, अशी अपेक्षा प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. उपनगरीय रेल्वेवर अवलंबून असलेल्या नोकरदार वर्गाबरोबरच तरुणांनाही रेल्वेकडून नव्या अपेक्षा नसून पूर्वीच्या घोषणा सत्यात आणण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा अनेक प्रवाशांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडणार असून त्यातून जुने घोषित प्रकल्प मार्गी लागावेत, इतकीच ठाणेकरांची अपेक्षा आहे. यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्पातून ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केल्या असल्याने आणि कालांतराने त्यात होणाऱ्या बदलांमुळे प्रवाशांची पुरती निराशाच होत असते. सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. गेल्या वर्षी सुरेश प्रभू यांनी पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. कधी नव्हे तो ठाण्यापलीकडच्या अनेक विकासकामांना गती देण्याचे आश्वासन त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून मिळाल्याने ठाणे आणि पलीकडच्या स्थानकातील प्रवासी समाधानी झाले होते. मात्र या अर्थसंकल्पाला एक वर्ष उलटले तरी कामांना सुरुवात झाली नसल्याने त्याचा फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा सत्यात येतातच असे नाही, अशी प्रवाशांची धारणा झाली आहे. याविषयी सगळ्या वयोगटांतील मंडळींच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता ठाणे’च्या माध्यमातून करण्यात आला. त्या वेळी नव्या घोषणा नको परंतु आधीच्या घोषणाची पूर्ती करा असाच सूर प्रवाशांनी आळवला आहे.
प्रलंबित प्रकल्प आणि मागण्या..
’ रेल्वे मार्गिकांची संख्या व गाडय़ांची संख्या वाढवणे
’ प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका आणि महत्त्वाच्या स्थानकात वैद्यकीय मदत कक्ष
’ ठाणे-कल्याण-कर्जत, कसारा शटल सेवा
’ ठाकुर्ली टर्मिनस
’ कल्याण-कर्जत, कसारा चौथी रेल्वे मार्गिका
’ उंबरमाळी, तानशेत, चिखलोलीसारख्या स्थानकांची निर्मिती
’ कल्याण माळशेज मार्ग
’ दिवा स्थानकातून लोकल, जलद गाडय़ांना थांबा.

रेल्वे अर्थसंकल्पावर अपेक्षांचे ओझे..
प्रवाशांच्या प्रतिक्रिया.
सध्या प्रत्येकालाच वेगाशी स्पर्धा करावी लागत आहे. प्रत्येक गोष्ट कमीत कमी वेळेत कशी होईल हे पाहिले जात आहे. प्रवासी वाहतुकीबाबत रेल्वेने हाच दृष्टिकोन बाळगायला हवा. त्या दृष्टीने वेगाने धावणाऱ्या हायस्पीड ट्रेन्स सुरू करणे गरजेचे आहे. खरे तर अशा वेगवान रेल्वेमुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेवरील ताणही आजच्यापेक्षा कमी हेणार आहे. याशिवाय रेल्वे स्टेशनवरील तसेच डब्यातील स्वच्छतेकडेही पुरेसे लक्ष दिले जायला हवे. सध्या अनेक रेल्वे स्थानके अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहेत. या संदर्भातही काही ठोस निर्णय अपेक्षित आहे. या संदर्भात ताज्या अर्थसंकल्पात काही तरतूद केली जाईल अशी अपेक्षा आहे.
– निधी पवार, दिवा

रेल्वे गाडय़ांच्या फेऱ्या वाढविल्याने गर्दीवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. गर्दीच्या वेळेस या गाडय़ांच्या फेऱ्या वाढवा. तसेच डोंबिवलीतून एखादी जलद गाडी सोडण्यात यावी जेणेकरून प्रवाशांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फलाटांची उंची वाढविण्याचे काम जे काही गेल्या एक वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. यंदाच्या बजेटमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या पारडय़ात काही तरी पडो हीच अपेक्षा.
-राजश्री खोत, डोंबिवली.

अपंगासाठी रेल्वेतर्फे एक राखीव डबा दिला जातो त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तींसाठी एक राखीव डबा द्यावा. आजकाल सर्वच ज्येष्ठ नागरिकांना गुडघ्याचा त्रास होतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी पटापट चढणे-उतरणे ज्येष्ठ नागरिक कठीण होते. शिवाय ज्येष्ठ नागरिकांमुळे बाकीच्या नागरिकांना उतरण्यास-चढण्यास त्रास होतो आणि त्यांची ज्येष्ठ नागरिकांवर चिडचिड होते. प्लॅटफॉर्मची उंची वाढवल्यानेही चढणे-उतरणे सोयीचे होईल या माफक अपेक्षा मोदी सरकार पूर्ण करेल अशी आशा आहे.
-नमीता सोमण (ज्येष्ठ नागरीक)

रेल्वे बजेट जाहीर झाल्यावर विविध योजनांचे निर्णय सांगितले जातील. ठाणे ते पनवेल किंवा पनवेल ते ठाणे या मार्गावरील रेल्वे गाडय़ांमध्ये वाढ व्हावी. दोन गाडय़ांमधील वेळेचे अंतर जास्त असल्याने या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होते. मुंबईप्रमाणेच पनवेल, वाशी या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे रेल्वे गाडय़ांच्या उपलब्धतेत वाढ हवी याचा विचार प्रशासनाने करावा. सतत काम सुरू असल्याने या ठिकाणच्या रेल्वे वेळेत निश्चित स्थळी पोहोचत नाहीत. मार्गावर करावी लागणारी सुधारणा एकाच वेळी करून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची मुक्तता करावी.
– तन्मय जाधव, ठाणे

रेल्वे बजेटमध्ये आत्तापर्यंत कल्याण-डोंबिवलीच्या वाटय़ाला फार कमी योजना आल्या असल्याचे पाहावयास मिळाले आहे. या वेळी तरी कल्याण-डोंबिवलीच्या पदरात नवीन काही पडेल असे वाटत नाही. डोंबिवलीतील गर्दी कमी होण्यासाठी गाडय़ांच्या फेऱ्या तर वाढवाव्यात परंतु नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रथम पाऊल उचलावे असे वाटते. नागरिकांनाच शिस्त नसल्याने गर्दीचा बळी अनेक प्रवासी ठरत आहे. आपल्याप्रमाणेच सर्वाचाच जीव मोलाचा आहे ही मानसिकता सर्वानी ठेवली तर नक्कीच यात फरक पडेल.
-प्रियांका टाकेकर, डोंबिवली.

रेल्वेच्या जुन्या गाडय़ांमध्ये अनेकदा वीज नसते. बोगद्यामध्ये गाडी गेल्यावर महिला डब्यात चोऱ्यांचे प्रकार घडतात. यासाठी प्रत्येक डब्यात सुरक्षेसाठी वीज हवी. अनेकदा महिला डब्यांच्या केवळ मधल्या आणि सुरुवातीच्या डब्यातच पोलीस सुरक्षा असते. शेवटच्या डब्यात पोलीस नसतात. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करताना महिलांसाठी धोक्याचे ठरते. योग्य व्यवस्थापन करून प्रशासनाने रेल्वे सुधारणांकडे गांभीर्याने पाहिल्यास प्रवाशांच्या हिताचे ठरेल.
– दिपश्री गावकर, कल्याण</strong>

येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये चढताना रांगेचे नियोजन करावे. तसेच त्यांच्यासाठी एक राखीव डबा देणे गरजेचे आहे. रेल्वे डब्यांची दारे इलेक्ट्रॉनिक करावी त्यामुळे रेल्वेच्या क्षमतेप्रमाणे त्या रेल्वेतून नागरिक प्रवास करतील. सध्या रेल्वेतून अनेक जण पडून मरण पावल्याचे पेपरमधून वाचतो. त्यामुळे मध्य रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी. रेल्वे ट्रॅकवरील तांत्रिक यंत्रणा फार जुनी झाल्याने त्यात सतत बिघाड होतो ही यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करून रेल्वेने वेळापत्रक पाळावे ही किमान अपेक्षा आहे.
– प्रकाश प्रधान (ज्येष्ठ नागरीक )

रेल्वेचा डोलारा कधीही कोसळण्याची शक्यता असून त्याचा फटका प्रवाशांना बसू शकतो. मध्य रेल्वेच्या मार्गावर सगळ्या जुन्या गाडय़ा चालवल्या जात आहेत. पैसे मात्र नव्या गाडय़ांचे घेतले जातात. त्यामुळे बुलेट ट्रेन, नव्या गाडय़ा, नवी स्थानके अशी आश्वासने देण्यापेक्षा रेल्वेने आहे ती व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. देखभाल दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे केलेल्या घोषणाच रेल्वेमंत्र्यांनी आधी पूर्ण करण्याची गरज आहे.
– उज्वल जोशी, ठाणे

रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या प्रसाधनगृहांची सद्य:स्थिती अतिशय बिकट आहे. महिला प्रवासी येथील अस्वच्छतेमुळे या प्रशासनगृहाकडे अक्षरश: पाठ फिरवितात. खासगी कंपन्यांच्या सहकार्यातून ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर वातानुकूलित प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे प्रसाधनगृह प्रत्येक स्थानकावर व्हावेत. तसेच प्रवाशांना वायफायची सुविधा देण्याऐवजी प्राथमिक सेवा-सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यायला हवे. वाढते अपघात, गुन्हेगारी, कोलमडणारे वेळापत्रक नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. वायफायची सेवा देण्यात गैर काहीच नाही, परंतु प्रवाशांची ही प्राथमिक गरज नक्कीच नाही. प्रवाशांसमोर आणि प्रशासनासमोर इतर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यावर फक्त चर्चा होते. ठोस उपाययोजना केली जात नाही. अशा परिस्थितीत वायफाय सुविधा देऊन नेमके काय साध्य होणार आहे? प्रसाधनगृह असणे वायफायपेक्षाही महत्त्वाचे आहे.
– प्रमोदिनी घाग, ठाणे

आजकाल पहिला वर्गातही तितकीच गर्दी असते त्यामुळे रेल्वे पकडणे त्रासाचे होते. मोठय़ा प्रमाणात महिला कामावर जातात त्यामुळे लेडीज स्पेशल रेल्वे चालू केली आहे. अशाच काही योजना राबविणे रेल्वे बजेटकडून अपेक्षित आहे. तसेच रेल्वे रूळ वाढवावे आणि गाडय़ांची संख्या वाढवावी. १५ डब्यांच्या जास्तीत जास्त गाडय़ा सुरू कराव्या त्यामुळे गर्दी कमी होईल. ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून सीएसटीकडे जाणाऱ्या
जास्तीत जास्त गाडय़ा सोडणे आवश्यक आहे. दिवा शहरातूनही रेल्वे सुरू कराव्या. यामुळे गर्दी कमी होईल.
– वसुधा पत्की (शिक्षिका)
(संकलन – भाग्यश्री प्रधान)