वाहतूक पोलीस नसल्याने बेशिस्त वाहनचालकांची अरेरावी

कल्याण : कल्याण-मोहनेदरम्यानच्या वडवली रेल्वे फाटकाजवळील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहनांचा भार वाढला आहे. रेल्वेच्या वाहतुकीमुळे हे फाटक पाऊण ते एक तास उघडले जात नसल्याने  मोठय़ा वाहतूक कोंडीला वाहनचालकांसह प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.   वाहनांचे नियोजन करण्यासाठी येथे वाहतूक पोलीस नसल्याने काही बेशिस्त वाहनचालकांचा फटका नागरिकांना  बसत आहे.

कल्याण शहरातील बाईचा पुतळा येथील उड्डाण पूल गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असल्याने शहाड पुलावर सर्व वाहनांचा भार वाढला आहे. अनेक वेळा या पुलावरून बाहेर पडताना अर्धा ते पाऊण तास लागतो. या कोंडीतून मुक्तता मिळण्यासाठी नगर, आळेफाटा, जुन्नर, मुरबाड आणि कल्याण ग्रामीणमधून येणारे बहुतांशी वाहनचालक गोवेली येथे डावे वळण घेऊन टिटवाळा मार्गे मोहने, आंबिवली रस्त्याने वडवली रेल्वे फाटकातून कल्याणमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी या रस्त्यावर फक्त वडवली, बल्याणी, मोहने, आंबिवली, टिटवाळा भागातील वाहनांची वर्दळ असायची. या वाहनांच्यामध्ये आता मुरबाडकडून येणाऱ्या बाहेरील वाहनांची भर पडली आहे. मात्र, हे फाटक रेल्वे वाहतुकीमुळे पाऊण ते एक तास उघडले जात नाही. तोपर्यंत फाटकाच्या दोन्ही बाजुला दोन ते तीन किमी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातच गेल्या काही दिवसांपासून लोकल वाहतूक बंद असल्यामुळे अनेक नोकरदार दुचाकी आणि मोटारीनेने कार्यालय गाठत आहेत. त्यामुळे या कोंडीत अधिकची भर पडत आहे.

या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसल्यामुळे रेल्वे फाटक उघडल्यानंतर तेथून बाहेर पडण्यासाठी सर्वच वाहनांची चढाओढ असते. यामध्ये स्थानिक वाहन चालकांचा अधिक सहभाग आहे.  या ठिकाणी बुधवारी सकाळी पाऊण तास रेल्वे फाटक न उघडले गेल्याने आणि या भागात फाटकाजवळ एक लोकल उभी राहिल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे सकाळच्या वेळी घराबाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाचे   हाल झाले. दररोज होणारी कोंडी टाळण्यासाठी वडवली रेल्वे फाटकाच्या दुतर्फा वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी कल्याण वाहतूक विभागाकडे केली आहे. वाहतूक शाखेकडे उपलब्ध मनुष्यबळ तुटपुंजे   असल्याचा प्रश्न  उपस्थित झाला आहे. तरीही वडवली रेल्वे फाटकाजवळ वाहतूक सेवक देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुलाचे काम संथगतीने

रेल्वे फाटकावर पूल बांधण्याचे काम मागील १२ वर्षांंपासून सुरू आहे. भूसंपादनामुळे गेले काही वर्ष हे काम रखडले होते. काही दिवसांपासून हे काम पुन्हा सुरू  झाले आहे. असे असले तरी हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.