कोकणातील प्रवासी चाचण्या न करता शहरात दाखल

कल्याण : मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात दोन महिन्यांपूर्वी करोना रुग्णांची संख्या वाढू लागताच अनेक मजूर जिवाच्या भीतीने मूळ गावी निघून गेले होते. आता रुग्णसंख्या कमी होऊ लागताच हे मजूर पुन्हा शहरात परतू लागले आहेत. परराज्यांत काही ठिकाणी करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने रेल्वे स्थानकावर करोना प्रतिजन चाचणी केंद्र सुरू केले असून, या ठिकाणी परराज्यांतून येणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी केली जात आहे. तर, कोकणातील प्रवासी चाचण्या न करता शहरात दाखल होत असल्याचे चित्र आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या साहाय्याने नागरिकांच्या करोना चाचण्या केल्या जात आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड या राज्यांतून मजूर कामगार अधिक संख्येने शहरात येत असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. परराज्यांतून येणाऱ्या रेल्वेगाडय़ांमधून कल्याण स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान फलाटावर रांगेत उभे करतात आणि त्यानंतर त्यांना प्रतिजन चाचणी केंद्रावर नेऊन त्यांची करोना चाचणी केली जाते. त्यामध्ये चाचणी अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांना तातडीने पालिकेच्या करोना काळजी केंद्रात दाखल केले जाते, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. राज्यात एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात प्रवास करण्यासाठी जिल्हा पोलिसांच्या प्रवास परवानगीचा ई-पास सोबत असावा लागतो. हा पास प्रवासाचे सबळ कारण दिल्याशिवाय मिळत नाही. मृत्यू, वैद्यकीय कारण असेल तर हा पास तात्काळ मिळतो. अनेक प्रवासी विविध कारणे देऊन हा ई-पास मिळविण्याचा प्रयत्न करतात. तरीही प्रवास पास जिल्हा पोलिसांकडून मिळत नाही. त्यामुळे शहरातून कोकणात जाणारे आणि कोकणातून शहरात येणारे नागरिक रात्रीच्या वेळेत प्रवास करीत आहेत.

चाचणी टाळण्यासाठी दोन स्थानकांच्या मध्येच उतरून पलायन

ठाणे, मुंबई तसेच कल्याण भागांतील रेल्वे स्थानकात करोना प्रतिजन चाचणी केली जाते. ही चाचणी टाळण्यासाठी अनेकजण रेल्वेगाडी मध्येच थांबल्यानंतर उतरून तेथून घर गाठत आहेत. लांब पल्ल्याची गाडी नाशिककडून येताना खडवली, टिटवाळा, आंबिवली परिसरांत फलाट सोडून थांबली तर तेथे मजूर उतरतात. पुण्याकडून येणारी गाडी बदलापूर, विठ्ठलवाडी, उल्हासनगर परिसरात थांबली तर तेथे मजूर उतरतात. त्यानंतर रिक्षा, टेम्पो, माल वाहतूक वाहनांमधून प्रवास करून घर गाठत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. परप्रांतामधून काही प्रवासी बसमधून शहरात येतात. हे प्रवासी भिवंडी बाह्य़वळण रस्ता, शिळफाटा रस्त्यावरील पिसवली भागांत रात्रीच्या वेळेत उतरतात, अशी माहिती एका प्रवाशाने दिली.