सणांचे वेळापत्रक रेल्वे प्रवाशांच्या अंगलट; मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लोकल गाडय़ांचे वेळापत्रक रविवारप्रमाणे करण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण प्रवाशांच्या अंगलट येऊ लागले असून बुधवारी ईदच्या निमित्ताने याच वेळापत्रकाचे परिचालन केले गेल्याने कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. बुधवारी सकाळपासूच लोकल गाडय़ा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यात वेळापत्रक रविवारप्रमाणे केले गेल्याने गाडय़ांची संख्या कमी करण्यात आली. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने या गोंधळात अधिक भर पडली.

दोन आठवडय़ांपासून तांत्रिक बिघाड आणि लांब पल्ल्याच्या उन्हाळी विशेष गाडय़ांमुळे मध्य रेल्वेच्या परिचालनात अडथळे येत आहेत. त्यामुळे दररोज रेल्वे सेवा विस्कळीत होत आहेत. सणांच्या दिवशी मध्य रेल्वेकडून रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल गाडय़ा सोडण्यात येतात. बुधवारीही रमजान ईद असल्याने रविवारच्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार लोकल गाडय़ा चालवण्यात आल्या. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. लोकल गाडय़ा वेळेत येत नसल्याने तसेच त्याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने कळवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी चालत ठाणे रेल्वे स्थानक गाठले.

ठाणे रेल्वे स्थानकात त्याहून अधिक बिकट परिस्थिती पाहून कळवा येथून आलेल्या प्रवाशांचा हिरमोड झाला. त्यातच डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. ईदनिमित्ताने मुंबईत फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांनाही या फटका सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या या ढिसाळ कारभाराविषयी अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

बुधवारी सकाळी ५.३० वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाला होता. अध्र्या तासात हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. यामुळे लोकल गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

– अनिल कुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

दोन आठवडय़ांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत आहे. दररोज वेळेच्या अगोदर निघूनही कार्यालयात पोहोचण्यात विलंब होत आहे. या बिघाडामुळे गाडय़ांमध्येही अधिकची गर्दी होत असून प्रवास करतानाही त्रास होत आहे.

– सुमेध मोहिते, प्रवासी.

सणांच्या दिवशी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल गाडय़ा चालवू नयेत यासाठी पाच वर्षांपासून  पाठपुरावा करीत आहोत. मात्र मध्य रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाही. प्रवाशांच्या उद्रेकाची वाट रेल्वे प्रशासन पाहत आहे का?

– विजय देसाई, खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती, कळवा.