प्रवासी संघटनांचा आग्रह

ठाणे-कल्याण, कसारा, कर्जत, खोपोलीदरम्यान रेल्वेच्या उपनगरी सेवेवर येणारा प्रवाशांचा ताण लक्षात घेता या मार्गावर शटल सेवा सुरू करा, असा आग्रह प्रवासी संघटनांकडून करण्यात आला आहे. या मार्गावर ७४ शटल सेवा सुरू करण्याची घोषणा २००८ मधील रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, सात वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. पुढील आठवडय़ामध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि प्रवासी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली असून या वेळी प्रवासी संघटनांच्या मागणीपत्रात या शटल फेऱ्यांना अग्रक्रम देण्यात आला आहे. याबरोबरच रखडलेल्या उंबरमाळी आणि तानशेत स्थानकांबरोबरच आसनगाव स्थानकातील स्वतंत्र फलाटाचीही मागणी प्राधान्याने केली जाणार आहे.

पुढील वर्षांच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून प्रवाशांच्या अपेक्षा जाणून घेण्याच्या उद्देशाने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी प्रवासी संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याणपुढील स्थानकांमध्ये कार्यरत असलेल्या प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आसनगाव स्थानकात रविवारी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी प्रत्येक स्थानकातील कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने ठाणे-कल्याण, कर्जत, कसारा शटल फेऱ्यांचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. २००८ मध्ये घोषणा होऊनही या फेऱ्या अद्याप पूर्णपणे सुरूच झाल्या नाहीत. तांत्रिक अडचणींची कारणे देऊन रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या गुंडाळून टाकल्या. प्रवासी संघटनांमध्ये याविषयी रोष आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वेची गर्दी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त शटल चालवण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या बैठकीतही या मागणीचा आग्रह कायम राहणार आहे, अशी माहिती कल्याण, कसारा आणि कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.

प्रवासी संघटनांच्या मागण्या..

*ठाणे-कल्याण, कसारा, कर्जतदरम्यान शटल सेवा चालवून गर्दीचे विभाजन करावे.

*उंबरमाळी, तानशेतला नवी स्थानके व्हावीत.

*आसनगाव स्थानकात लोकलगाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट उपलब्ध करून द्यावे.

*कल्याणपलीकडच्या स्थानकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

*स्थानकांच्या फलाटांची उंची वाढवावी, आवश्यक ठिकाणी गाडय़ांसाठी रस्ते वाहतूक पूल आणि पादचारी पुलांची निर्मिती करण्यात यावी.