02 March 2021

News Flash

परिवहनच्या असुविधेमुळे प्रवाशांचा उद्रेक

रेल्वेत प्रवेश नाही, अपुऱ्या बस यांमुळे नालासोपाऱ्यात आंदोलन;

रेल्वेत प्रवेश नाही, अपुऱ्या बस यांमुळे नालासोपाऱ्यात आंदोलन; एसटी प्रशासन म्हणते, कर्मचाऱ्यांची वानवा

सुहास बिऱ्हाडे, वसई

वसई : नालासोपाऱ्यात बुधवारी प्रवाशांनी उत्स्फूर्त केलेले आंदोलन हे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या होत असलेल्या असंतोषाचा भडका असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवासी कामावर जाण्यासाठी धडपडू लागले आहेत. मात्र एसटी प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ते अधिक फेऱ्या देऊ शकत नाही, तर दुसरीकडे रेल्वे परवानगी देत नाही. त्यामुळे चिडलेल्या नोकरदार वर्गाने बुधवारी आंदोलनाचे हत्यार उगारले.

राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) पालघर जिल्ह्यात एकूण आठ विभाग आहेत.  करोनाचे संकट सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने टाळेबंदी जाहीर केली होती. मात्र तरीही एसटी सेवा अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू होती. पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक वाहतूक वसई, नालासोपारा आणि विरार आगारातून होत आहे. नालासोपारा आगारात एकूण २४८ कर्मचारी आहेत. मात्र सध्या केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहात आहेत. यामुळे बस असूनही वाहक आणि चालकांची कमतरता जाणवत आहे, अशी माहिती नालासोपारा आगार प्रमुख प्रज्ञा सानप यांनी दिली. नालासोपारा आगारातून दररोज सकाळ आणि संध्याकाळी ३०० बसफेऱ्या होतात. वाहक-चालक नसल्याने इतर आगारातून चालक मागविण्यात आले होते.

नालासोपाऱ्यातून सर्वाधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. टाळेबंदी शिथिल होऊ  लागल्याने खाजगी कंपन्या, कार्यालये सुरू झाली. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वत:ची वाहतूक व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र सर्वसामान्य प्रवाशांकडे एसटीशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत होती.

एसटीची सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जरी असली तरी मागील ४ महिन्यांपासून सर्वाना प्रवेश दिला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढली होती. नालासोपारा हे करोनाचे केंद्र आहे. सरसकट सर्वच प्रवाशी एसटीतून प्रवास करू लागल्याने एसटीने दोन दिवसांपासून प्रवाशांची ओळखपत्र तपासणे सुरू केले होते. कर्मचारी कमी असल्याने बसची संख्या कमी होती. प्रवाशांची संख्या वाढत होती आणि बस वेळेवर सुटत नसल्याने उद्रेक झाला आणि त्याची पहिली ठिणगी मंगळवारी पडली. मंगळवारी सुमारे दोनशे प्रवाशांनी नालासोपारा आगारात आंदोलन केले होते. त्याचा भडका बुधवारी उडाला. प्रवाशांनी एसटी आणि रेल्वेच्या विरोधात घोषणाबाजी करत  रेल्वे स्थानकात आंदोलन केले.

पगार नसल्याने कर्मचारी नाराज

राज्य परिवहन महांडळाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात केली आहे. जे कामावर येतील, त्यांनाही ५० टक्के वेतन आणि जे कामावर येणार नाहीत त्यांनाही ५० टक्के वेतन दिले जात आहे. यामुळे कामावर येणारे कर्मचारी कमालीचे नाराज आहे. आम्हाला मार्च महिन्यातील ८ दिवसांचा पगार दिला नाही. मे महिन्याचा पगार अर्धा मिळाला तर जुलै संपत आला तरी जून महिन्याचा पगार दिलेला नाही, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे नालासोपारा अध्यक्ष मोहन नाईक यांनी दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगी आहे तर आम्हाला का नाही? मला डायलिलीस रुग्णाला घेऊन मुंबईत जावे लागते. दोन तास एसटीच्या रांगेत कसे थांबणार? प्रत्येक वेळी कागदपत्रे मागतात.

– सायली बावकर, प्रवासी

आम्ही भाडेकरू आहोत. कर्जे थकली आहेत. भाजीपाल्याला पैसे नाहीत मग कामावर जायचं कसं? एसटीचं भाडेही महाग आहे. एसटीचे भाडेही भरपूर आहे ते परवडत नाही.

– जागृती गणके, प्रवासी

आम्हाला कंपनी म्हणते, स्वत: सोय करून या नाहीतर घरी बसा. ही आमची मजबूरी आहे. म्हणून आम्ही प्रवास करतो. पण रेल्वे आणि एसटी दोन्ही आमची अडवणूक करतात.

– सचिन राणे, प्रवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 1:44 am

Web Title: passengers protest at nalasopara railway station due to inconvenience in transportation zws 70
Next Stories
1 मीरा-भाईंदर पालिकेला शासनाकडून १० कोटी
2 पालिकेच्या शाळेत ८ मुख्याध्यापकांची कमतरता
3 ठाणे जिल्ह्य़ात १,६९१ नवे बाधित
Just Now!
X