शेती, पर्यावरण तज्ज्ञांचा सहभाग
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट, अंबरनाथ येथील पी. डी. कारखानीस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते ३० डिसेंबरदरम्यान मुरबाड तालुक्यातील पऱ्हे गावात महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून परिसरातील गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर, परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावा, परिसर स्वच्छता, शाळांचे सक्षमीकरण आदी उपक्रमही महोत्सवात राबविण्यात येणार आहेत.
या महोत्सवाची सुरुवात १६ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिराने होईल. कारखानीस महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि रोटरी प्रतिनिधी संयुक्तपणे गाव सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होणार आहेत. जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपे, रोटरी जल व्यवस्थापन विभाग प्रमुख हेमंत जगताप, डॉ. कैलास पवार, डॉ. प्रद्युन आंबेकर, सर्जेराव सावंत, उमेश तायडे, देवेंद्र ताम्हणे आदी या शिबिरादरम्यान विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत.
महोत्सवात शुक्रवार २५ डिसेंबर रोजी शेतकरी मेळावा घेण्यात येणार असून त्यात शेखर भडसावळे, राजीव भट, गणेश देशमुख, अनिल पाटील, कृषी अधिकारी रवींद्र पाटील आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आरोग्य शिबिराअंतर्गत बालतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच नेत्रतज्ज्ञ परिसरातील ग्रामस्थांची तपासणी करणार आहेत. त्याचप्रमाणे गुरांचीही आरोग्य तपासणी होईल. ३० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, स्थानिक आमदार किसन कथोरे आणि रोटरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती संयोजक देवेंद्र जैन यांनी दिली.