अंबरनाथ नगरपालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाच्या डॉ. आशिष परमार यांना मृत रूग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉ. परमार जखमी झाले असून रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
अंबरनाथ पश्चिमेकडील जावसई भागात राहणारे दिनेथ पारछे (३५) यांना काही दिवसांपासून तापाची लागण झाली होती. त्यांच्यावर डॉ. परमार यांच्या खाजगी दवाखान्यात उपचार चालू होते. मंगळवारी रात्री ९च्या सुमारास दिनेश यांची प्रकृती बिघडल्याने डॉ. परमार यांनी त्यांना छाया रुग्णालयात बोलविले होते. परंतु रुग्णालयात पोहचताच दिनेश यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या संतप्त नातेवाईकांनी डॉ. परमार यांना मारहाण केली. त्यामुळे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष रायबोळे यांनी मुख्याधिकारी व पोलिसांना घटनास्थळी बोलवले. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत दिनेश यांचे शव उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल येथे पाठविले होते. परंतु शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने मृत्यूचे कारण अजून कळलेले नाही.
दरम्यान, दिनेश यांचा मृत्यू हा स्वाईन फ्लूमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी खरे कारण शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोटारसायकल चोऱ्या सुरूच
ठाणे : कल्याण येथे राहणाऱ्या राजेश दिनानाथ गुप्ता (३४) यांची सोमवारी रात्री त्यांच्या इमारतीच्या आवारातून चोरटय़ाने मोटारसायकल चोरली. कल्याण येथील मुरबाड रोड परिसरात राहणाऱ्या छगन तावडे (४८) यांची शनिवारी सिंडिकेट बँकेजवळून मोटारसायकल चोरटय़ाने चोरून नेली. भांडुप परिसरात राहणाऱ्या अतुल सावंत (४४) यांची शनिवारी लोकमान्यनगर बस डेपोजवळून मोटारसायकल चोरण्यात आली. या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिशवी कापून दोन लाखांची चोरी
ठाणे : दिवा येथे राहणाऱ्या अपेक्षा भोईर (२०) या मंगळवारी शीळ रोड परिसरातील बाजारात गेल्या होत्या. तेव्हा भोईर यांच्या हातातील प्लॅस्टिकची पिशवी ब्लेडने फाडून चोरटय़ाने त्यातील दोन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कार्यालयातून चोरी
ठाणे : मुंब्रा येथे राहणाऱ्या शकील अब्दुल करीम शेख (३९) यांच्या कौसा येथील एलिट डेव्हलपर्स या कार्यालयात मंगळवारी चोरी झाली. शेख बाहेरील शटर बंद करून घरी गेले असता चोरटय़ाने स्वच्छतागृहाच्या खिडकीतून कार्यालयात प्रवेश केला. आणि ५५ हजार रुपये चोरले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणात बसचोरी
कल्याण : अंबरनाथ येथे राहणाऱ्या धनाजी सुरोशे यांचा खाजगी वाहतुकीचा व्यवसाय आहे. कल्याण येथील घोलपनगर भागात उभी केलेली सुरोशे यांची सहा लाख रुपये किमतीची बस चोरटय़ाने चोरली. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडीत घरफोडी
भिवंडी : येथील कोनगाव भागात राहणाऱ्या तुषार गजानन पाटील (३४) यांच्या घरी मंगळवारी चोरी झाली. पाटील यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी उचकटून चोरटय़ाने आत प्रवेश केला. आणि लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने,रोख असा ६२ हजार सातशे रुपये किंमतीचा ऐवज चोरला. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.