कॉल सेंटरच्या माध्यमातून चर्चा घडवणार; पालिका प्रशासनाचा प्रस्ताव

ठाणे : शहरामध्ये घरीच विलगीकरणात असलेले सहव्याधी, जोखमीचे रुग्ण आणि करोनातून बरे झाल्यानंतर गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांच्या तब्येतीची दररोज चौकशी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एका कॉल सेंटरच्या माध्यमातून अशा रुग्णांचा आणि डॉक्टरांचा दररोज संवाद घडवून दिला जाणार आहे. यामुळे करोना मृत्युदर कमी करणे शक्य होणार असल्याचा दावा करत प्रशासनाने यासंबंधीचा प्रस्ताव १९ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे.  ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत १,७८४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६०० जणांनी उपचारास विलंब केल्यामुळे त्यांना आपले प्राण गमावावे लागल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता घरीच विलगीकरणात असलेले सहव्याधी, जोखमीचे रुग्ण आणि करोनातून बरे झाल्यानंतर गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांच्या तब्येतीची दररोज चौकशी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिका एक सुसज्ज कॉल सेंटर उभारणार आहे. या कॉल सेंटरमध्ये नियुक्त केलेले प्रतिनिधी घरीच विलगीकरणात असलेले सहव्याधी, जोखमीचे रुग्ण आणि करोनातून बरे झाल्यानंतर गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांना दररोज फोनद्वारे संपर्क साधून त्यांची दैनंदिन नोंद ठेवणार आहेत. तसेच त्यामध्ये एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावली असेल तर त्या रुग्णाचा तातडीने महापालिका डॉक्टरांशी संवाद घडवून आणण्याचे काम कॉल सेंटरमधील प्रतिनिधी करणार आहेत. या कामासाठी महापालिका डॉ. स्वाती शिंदे, डॉ. मनीषा म्हस्के, डॉ. नेहा कोल्हे आणि डॉ. तानाजी पाटील या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची करार पद्धतीवर तीन महिन्यांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना दरमहा ६० हजार वेतन दिले जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

रुग्णांच्या तब्येतीची नोंद

सहव्याधी असलेल्या नागरिकांची नियमितपणे माहिती घेतली तर त्यांना करोना होण्याचा आणि त्यांच्यामुळे इतरांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका टाळणे शक्य होईल. कॉल सेंटरच्या माध्यमातून अशा नागरिकांचा आवश्यकतेनुसार संबंधित डॉक्टरांशी संवाद घडवून दिला जाणार आहे. तसेच करोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांमध्ये अतिगंभीर लक्षणे आढळून येतात. त्यामुळे अशा रुग्णांनाही दैनंदिन फोन करून त्यांच्या तब्येतीची नोंद घेण्यात येणार आहे.