नातेवाईकांची पोलिसात तक्रार

ठाणे : करोनाबाधित रुग्णांना तात्काळ उपचार व्हावेत, या उद्देशातून महापालिकेने मोठा गाजावाजा करत उभारलेल्या साकेत येथील ग्लोबल इम्पॅक्ट हबमधील तात्पुरत्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले दोन रुग्ण बेपत्ता झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच याच मुद्दयावरून राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिका आणि रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील करोनाबाधित रुग्णांवर तात्काळ आणि मोफत उपचार व्हावेत या उद्देशातून महापालिका प्रशासनाने साकेत येथे एक हजार खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारले आहे. याठिकाणी रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात असले तरी याठिकाणी डॉक्टर आणि पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याची टीका होत आहे. असे असतानाच या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले दोन रुग्ण बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कळवा परिसरात राहणाऱ्या ७१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. २९ जून रोजी त्यांना ग्लोबल इम्पॅक्ट हबमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ते रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलिस ठाण्यात रुग्ण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या वृत्तास कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

 

‘सुविधा पुरवण्यावर भर द्या’

ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये अतिशय सुंदर कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहेत. मात्र, याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत आणि रुग्ण संख्या वाढीचे योग्य व्यवस्थापन होत नाही, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या रुग्णालयातून दोन रुग्ण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी त्यांच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे केल्या आहेत. सुंदर व्यवस्था निर्माण करण्यापेक्षा तिथे सुविधा पुरविण्यावर भर द्या, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.