निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप; अद्याप पोलिसांकडे तक्रार नाही

विरारमधील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी मारहाण केली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नालासोपारा येथे राहणारे रामकिशन यादव हे ६५ वर्षीय वृद्ध दम्याचा विकाराने आजारी होते. दोन दिवसांपूर्वी ते विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील आरूषी रुग्णालयात दाखल झाले, मात्र रविवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच यादव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मयत यादव यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हजर असलेले डॉक्टर सुनील त्रिपाठी (४०) आणि मदतनीस असलेले कर्मचारी विकास मौर्या (२३) यांना मारहाण करायला सुरुवात केली. सुमारे ५० जणांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या आवारात बेदम मारहाण केल्याचे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रमोद यादव यांनी सांगितले. डॉ. सुनील त्रिपाठी यांच्यावर विरारमधील संजीवनी रुग्णालयात अतिदक्षता विभागात तर विकास मोरे याच्यावर नालासोपारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांनी आमची अडवणूक केली. जास्त पैसे मागितले. हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप मयत रामकिशन यांच्या मुलीने केला, तर आम्हाला आमच्या वडिलांच्या मृत्यूच्या मोबदल्यात डॉक्टरांचाच जीव हवा, अशी संतप्त मागणी त्यांनी केली.

आमच्याकडे अद्याप तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास गुन्हा दाखल करू, असे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले. विरार पोलिसांनी सध्या या प्रकरणाची अपमृत्यू म्हणून नोंद केली आहे.