डोंबिवलीत खासगी करोना रुग्णालयांमध्ये रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या वाढीव बिलांच्या तक्रारी सातत्याने वाढत असताना औषधांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एका करोना रुग्णाला व्यवस्थापनाने चक्क बँकेच्या एटीएममध्ये पिटाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

डोंबिवलीतील एक दाम्पत्य करोनाबाधित आहे. ज्येष्ठ नागरिक असलेली पत्नी गृह विलगीकरणात तर पतीला उपचारासाठी डोंबिवली मानपाडा रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोना रुग्ण असल्यामुळे कोणीही कुटुंबीय, नातेवाईक रुग्णाजवळ नसते. रुग्णालयात दाखल होताना या रुग्णाने तात्काळ पैसे लागणार नाहीत असे वाटल्याने पैसे जवळ ठेवले नव्हते. आवश्यक सामान घेऊन ते रुग्णालयात दाखल झाले. पैशाची गरज लागली तर त्यांनी बँकेचे एटीएम कार्ड सोबत ठेवले होते. या रुग्णाला डॉक्टरांनी औषधे लिहून दिली. त्यामधील काही औषधे बाहेरून मागवावी लागतील असे सांगण्यात आले. ते पैसे तात्काळ द्यावे लागणार आहेत, असे या रुग्णाला सांगण्यात आले. आपणाकडे पैसे नाहीत. रुग्णालयाने ती औषधे आणून आपल्या खर्चात दाखवावीत. देयक भरणा करताना आपण ते पैसे एकदम देऊ, असे आर्जव या रुग्णाने केले. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाने या रुग्णाचे काही ऐकले नाही. पैसे दिल्याशिवाय आवश्यक औषध, इंजेक्शन आणता येणार नाहीत, असे सारखे या रुग्णाला सांगण्यात येत होते. आपली मागणी मान्य होत नाही हे लक्षात आल्यावर रुग्ण सरळ रुग्णालयातून निघून बँकेत गेला. तेथील एटीएममधून आवश्यक तेवढे पैसे काढले. ते रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आणून दिले, असे रुग्णाशी संबंधित निकटवर्तीयांनी सांगितले.

या रुग्णाला रक्तद्रव (प्लाझ्मा)ची गरज होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी एका महाविद्यालयीन तरुणाच्या माध्यमातून रक्तद्रव देण्याची तयारी केली. परंतु, या रुग्णालयाने त्या तरुणाकडून कागदपत्रे जमवाजमव करण्यासाठी चार दिवस घालविले. अखेर कागदपत्रे जमविण्यात अडथळे आल्याने रुग्णालयाने परस्पर रक्तद्रव मिळविण्याची कार्यवाही केली, असे रुग्णाच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आले. रुग्ण संबंधित रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा रुग्णालयाकडून त्रास नको म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी नाव प्रसिद्ध करण्यास नकार दिला. या प्रकरणाची रुग्णाच्या नातेवाईकांकडून पालिका प्रशासन, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.