लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कचोरे ते पत्रीपूल या शंभर मीटर लांबीच्या ९० फुटी रस्त्याचे जोडकाम गेली सहा वर्षे रखडले होते. या प्रकरणात रस्ते मार्गात अडसर ठरलेला भूखंड मालक आणि पालिका प्रशासन यांच्यातील सामंजस्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. हा विषय प्रशासन पातळीवर सुटताच बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दोन्ही बाजूची सीमारेषा निश्चित करून मंगळवारपासून रस्ते कामाला सुरुवात केली.

९० फुटी रस्ता नेतिवली टेकडीच्या पायथ्याशी कचोरे गावाजवळ आल्यानंतर पत्रीपुलाजवळ जोडण्यात आला नव्हता. कचोरे गावाजवळ विकास आराखडय़ातील मार्गात एक खासगी भूखंम्डाचा अडसर आला होता. भूखंड मालक मनासारखा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत रस्ते काम करू देण्यासतयार नव्हता. या रखडलेल्या रस्त्यामुळे ९० फुटी रस्त्याने डोंबिवली, एमआयडीसी भागातून येणाऱ्या वाहन चालकांना कचोरे गावातील नेतिवली टेकडीच्या पायथ्याखालील निमुळत्या रस्त्याने वळसा घेऊन जावे लागत होते.

या रस्त्याने डोंबिवलीतून मोटारी, रिक्षा, टेम्पो, ट्रक, डम्पर अशी वाहतूक होत असून या निमुळत्या रस्त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते.

नगररचना विभागातील सव्‍‌र्हेअरनी या रस्त्याचे सीमांकन निश्चित करून दिल्यानंतर बांधकाम विभागाने मंगळवारपासून रखडलेला पोहच रस्ता बांधणीचे काम सुरू केले. पत्रीपुलाची तुळई त्याच्या आजूबाजूचे रस्ते काम सुरू असतानाच हा १०० मीटर लांबीचा रस्ता बांधून पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी कचोरे प्रभागाच्या नगरसेविका रेखा चौधरी, आमदार प्रमोद पाटील, मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी प्रयत्न केले.