लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणाऱ्या पत्रीपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीत कल्याण-डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या पुलाच्या कामाला गती देण्यासाठी शिवसेना नेत्यांनी धावाधाव सुरू केली असून नुकतीच या पुलावर लोखंडी तुळई बसवण्यात आली आहे. या कामाच्या निमित्ताने शिवसेनेने पत्रीपूल परिसरात जोरदार फलकबाजी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्थानिक शिवसैनिकांसोबत दोन दिवस कामाच्या ठिकाणी तळ ठोकून कामाचा आढावा घेत असल्याचे दिसून आले. मात्र, शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शहरातील रखडलेले पूल आणि त्यामुळे होणारी वाहनकोंडी हे मुद्दे सत्ताधारी शिवसेनेसाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर या पुलांची कामे मार्गी लागावीत यासाठी शिवसेनेचे नेते सक्रिय झाले असून या पुलाच्या कामाला गती देण्यासाठी धावाधाव करत आहेत. तुळई बसविण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र तसेच हे काम करण्यासाठी लागणारा मेगाब्लॉक मिळवण्यासाठी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आले. तर दोन दिवस चाललेल्या या कामाच्या वेळी खासदार शिंदे हे पुलाच्या ठिकाणी स्थानिक नेत्यांसह तळ ठोकून होते.

यावेळी स्वत: तुळईवर चढून कामाचा आढावा घेताना खासदार डॉ. शिंदे दिसून आले. तसेच राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या बडय़ा नेत्यांसह स्थानिक नगरसेवकांनीही कार्यकर्त्यांसोबत कामाच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती.

यावेळी स्थानिक शिवसेना नेत्यांनी पुलाच्या ठिकाणी मोठे फलक झळकावलेले पाहायला  मिळाले. मात्र, आगामी निवडणुकीच्या तोंडावर स्थानिकांची नाराजी ओढावून न घेण्यासाठी शिवसेना कामाचे श्रेय लाटत असून पत्रीपुलाचा कामाचा इव्हेंट केल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

समाजमाध्यमांवर पडसाद

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या बडय़ा नेत्यांनी तुळई बसविण्याच्या कामाच्या ठिकाणी हजेरी लावली. पूल परिसरात सेनेकडून ‘करून दाखवले’ असे फलकही लावण्यात आले होते. त्यावर समाजमाध्यमांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेच्या या श्रेयवादावर टिप्पणी करणाऱ्या विनोदी मिमचीही रेलचेल दिसली.

गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. मात्र, या काळात आमच्या दोन्ही शहरांची अवस्था अतिशय गंभीर झाली. पत्रीपुलाचा इव्हेंट हा अपयश सावरण्याचा प्रयत्न होता. यावेळी पुलावर जशी तुळई खेचली जात होती. तशाच प्रकारे पक्षाची घसरलेली पातळी वर आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला.
– राजेश कदम, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

करोनामुळे या कामासाठी काहीसा विलंब झाला. तसेच पुलासाठी लागणारी तुळई बनविण्याचे काम देशात एकच ठिकाणी हैदराबाद येथे होते. खासदारांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे. सध्या काम सुरू असताना मध्ये आडकाठी आणणे चुकीचे आहे. केवळ टीका करून प्रसिद्धी मिळत नाही.
– गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाप्रमुख, शिवसेना