29 October 2020

News Flash

पापडखिंड धरणाबाबत नागरिकांकडून सूचना

विरारचे पापडखिंड धरण बंद करण्याचा निर्णय महापालिकेने नुकताच घेतला होता.

जनक्षोभानंतर महापालिकेचा सावध पवित्रा

विरारच्या पापडखिंड धरण बंद करण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. यामुळे महापालिकेने आता सावध पवित्रा घेतला असून नागरिकांकडून पाण्याचा वापर करावा अथवा करू नये याबाबत सूचना मागवल्या जाणार असल्याचे महापौरांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

विरारचे पापडखिंड धरण बंद करण्याचा निर्णय महापालिकेने नुकताच घेतला होता. हे पापडखिंड धरण बंद करून त्या ठिकाणी वॉटर पार्क विकसित करण्याची महापालिकेची योजना आहे. सुस्थितीतले धरण अशा प्रकारे बंद करून तेथे मनोरंजनासाठी वॉटर पार्क बनवण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. शहरातील नागरिकांनी पालिकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे, तर विविध राजकीय पक्षांनी हे धरण बंद होऊ  देणार नाही, असा पालिकेला इशार देत आंदोलन पुकारले आहे. यामुळे आता महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. पापडखिंड धरणाचे पाणी ज्या भागातील नागरिकांना दिले जाते, त्यांच्याकडूनच सूचना मागवल्या जातील आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे वसई-विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी सांगितले.

याबाबत बोलताना महापौर जाधव यांनी सांगितले की, पूर्वी शहराला सूर्या, उसगाव आणि पेल्हार धरणातून १३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत होता. आता सूर्याच्या पुढील टप्प्यातून १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. म्हणजे शहरात २३० दशलक्ष लिटर एवढे मुबलक पाणी मिळू लागले आहे. पापडखिंड धरणातून केवळ १ दशलक्ष लिटर पाणी मिळायचे. येथील ७५ टक्के नागरिकांनी आम्हाला पापडखिंडचे नको तर सूर्याचे पाणी द्या, अशी मागणी केली होती.

शिवाय पापडखिंड धरणाच्या जलशुद्धीकरणाचा प्रकल्प खर्चीक असल्याने तो बंद करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता आम्ही नागरिकांची मते मागवू आणि जर नागरिकांनी धरण पूर्ववत सुरू ठेवण्यास सांगितले तर आम्ही त्यावर विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

पापडखिंड धरणात विविध कारणांमुळे प्रदूषण होत आहे, हे मान्य आहे. मात्र शहरात मुबलक पाणी असल्याने त्या पाण्याची गरज नसल्याने ते बंद करण्याचा विचार केला गेला होता.

रुपेश जाधव, महापौर, वसई-विरार 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 3:00 am

Web Title: pawankhind dam vasai virar municipal corporation
Next Stories
1 स्वत:ची पाणीपुरवठा योजना उभारणारे गाव!
2 मनपसंत गृहरचनेची ठाण्यात मुभा!
3 शहरांच्या वेशीवर कचऱ्याचे साम्राज्य
Just Now!
X