24 November 2020

News Flash

दंड भरा, अन्यथा वाहन जप्त

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मात्र दंडाची रक्कम भरण्यास हयगय करणाऱ्या वाहनचालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ई चलानद्वारे आकारण्यात येणाऱ्या ५ हजारांहून अधिक दंडाची प्रकरणे प्रलंबित राहिल्याने या दंडवसुलीसाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

‘ई-चलन’ पाठवलेल्या वाहनमालकांना वाहतूक पोलिसांचा इशारा

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मात्र दंडाची रक्कम भरण्यास हयगय करणाऱ्या वाहनचालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ई चलानद्वारे आकारण्यात येणाऱ्या ५ हजारांहून अधिक दंडाची प्रकरणे प्रलंबित राहिल्याने या दंडवसुलीसाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. येत्या दहा दिवसांत प्रलंबित दंडाची रक्कम भरा अथवा वाहनांची जप्ती केली जाऊ शकते, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी ही अंतिम मुदत आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात १४ फेब्रुवारी २०१९ पासून ई चलानद्वारे वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. या कारवाईत वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनचालकाच्या वाहन क्रमांकाचे छायाचित्र काढत असतात. त्यानंतर त्यांच्या दंडाची माहिती वाहनमालकाला मोबाइल संदेशाद्वारे मिळत असते. हा दंड वाहनचालकांना पोलिसांच्या विविध संकेतस्थळे तसेच पोलिसांकडे डेबिट कार्डद्वारे भरता येतो.

अनेकदा वाहनचालक ही दंडाची रक्कम भरत नाहीत. त्याचा परिणाम सरकारच्या महसुलावरही होत आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी येत्या १० दिवसांत वाहनचालकांनी त्यांच्या प्रलंबित दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर १ डिसेंबरपासून पोलिसांकडून नाकाबंदी सुरू केली जाणार आहे. या नाकाबंदीत पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. सुरुवातीला व्यावसायिक वापराच्या वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यांना अडवून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. ही रक्कम न भरल्यास मोटर वाहन कायद्यानुसार त्यांची वाहने जप्त केली जाणार आहे.

दंड भरल्यानंतर ते वाहन पुन्हा दिले जाणार आहे. त्यानंतरही दंड न भरल्यास संबंधित वाहनचालकाचा वाहन परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित करण्याची प्रक्रिया केली जाण्याची शक्यता असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

अशी भरा दंडाची रक्कम

१४ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत पोलिसांनी ६ लाख ३० हजार २३२ ई चलान कारवाई केली. त्यात २१ कोटी १४ लाख ३६ हजार २३२ रुपये दंड आकारला आहे, तर या वर्षी १ जानेवारी ते १८ नोव्हेंबपर्यंत ५ लाख ५२ हजार ४५३ ई चलान कारवाई केली. यात २२ कोटी २ लाख ७५ हजार १५० दंड आकारला आहे. यातील अनेकांनी त्यांचे दंड भरलेले नाहीत. असे प्रलंबित दंड राज्य सरकारच्या महाट्राफिक जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊ दंड भरता येऊ शकतात. यासह पेटीएम अ‍ॅप, महाट्राफिक अ‍ॅप, माय व्हेइकल येथे वाहनाची नोंदणी करून माय ई चलानमध्ये जाऊन दंड भरता येणार आहे.

ज्या वाहनचालकांचा दंड ५ हजारांहून अधिक आहे त्यांनी तात्काळ परिसरातील वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून रक्कम भरावी. अन्यथा ऑनलाइनही रक्कम भरता येणार आहे. १० दिवसांनंतर पोलीस नाकाबंदी करून किंवा घरी नोटीस पाठवून दंड वसूल करणार आहे. दंड न भरल्यास कायद्यानुसार वाहन जप्त केले जाऊ शकते.
– बाळासाहेब पाटील, उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 2:55 am

Web Title: pay fine or vehicle will be seized dd70
Next Stories
1 रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी केडीएमटीची सेवा
2 मेट्रोच्या कामामुळे अपघातांचा धोका
3 ठाण्यात कोलशेत भागात मेट्रोचे कास्टिंग यार्ड
Just Now!
X