सायबर भामटय़ांच्या फसवणुकीला बळी पडणाऱ्यांत वाढ

ठाणे : ‘पेटीएम’ डिजिटल वॉलेटचे ‘केवायसी’ (वापरकर्त्यांबाबतचा अत्यावश्यक तपशील) कालबाह्य झाले असून २४ तासांच्या आत मिळालेल्या लघुसंदेशातील मोबाइल क्रमांकाशी संपर्क साधा.. अशा प्रकारचा लघुसंदेश तुम्हाला मोबाइलवर आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. कारण ‘केवायसी’ अद्ययावत करण्याच्या नावाखाली वापरकर्त्यांना गंडवून त्यांच्या बँक खात्यातील मोठय़ा रकमा लंपास करणाऱ्या सायबर भामटय़ांना सध्या जोर चढला आहे. ठाणे पोलीसही यासंदर्भात जनजागृती करत आहेत.

इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. अशा ऑनलाइन व्यवहारांमध्ये सुलभता आहेच; शिवाय ग्राहकांचा वेळही वाचतो. त्यामुळे अनेक मोबाइलधारक पेटीएम किंवा तत्सम डिजिटल वॉलेट अ‍ॅपचा वापर अधिकधिक करू लागले आहेत.   (पान ६वर) (पान १वरून) मात्र, याचाच गैरफायदा सायबर भामटय़ांनी घेण्यास सुरुवात केली आहे. ‘पेटीएम’च्या वापरकर्त्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनाच भामटे लक्ष्य करत आहेत. ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात पेटीएम अ‍ॅपच्या नावाने केवायसी अद्ययावत करताना फसवणूक झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. यात अनेकांची लाखो रुपयांची फसवणूकही झाली आहे. ठाण्यातील वर्तकनगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला दोन आठवडय़ापूर्वी भामटय़ाने अशाचप्रकारे संपर्क साधून त्याच्या बँक खात्यातील १३ लाख ९ हजार ९११ रुपये लंपास केले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गेल्या १५ दिवसांपासून सायबर कक्षाकडे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढू लागली आहे. ही फसवणूक करताना वापरण्यात आलेले मोबाइल क्रमांक हे बाहेरील राज्यातील असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासंबंधी ट्विटर आणि समाजमाध्यमांवर माहिती प्रसारित करण्याव्यतिरिक्त पोलिसांना आरोपींचा शोध घेणे शक्य झालेले नाही.

फसवणुकीची पद्धत

  •  सर्वप्रथम पेटीएम वापरकर्त्यांच्या मोबाइलवर लघुसंदेश येतो. ‘तुमच्या पेटीएमची केवायसी कालबाह्य झाली असून २४ तासांत ती अद्ययावत करा. त्यासाठी सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकाशी संपर्क साधा’ अशी सूचना या संदेशामध्ये केली जाते.
  •  पेटीएम खाते बंद होण्याच्या भीतीने वापरकर्ते संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधतात. तो सायबर भामटय़ांचा असतो. ते ग्राहकाला ‘क्यूएस’ (क्वीक सपोर्ट) नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगतात. त्यासाठीची लिंक ग्राहकांना लघुसंदेशाद्वारे पाठवली जाते.
  •  संबंधित अ‍ॅप डाऊनलोड करताच, ग्राहकाची सर्व माहिती सायबर भामटय़ांना मिळते व त्याआधारे ते ग्राहकांच्या बँकखात्यातील किंवा पेटीएम खात्यातील रक्कम लंपास करतात.

पेटीएम कंपनी त्यांच्या कोणत्याही ग्राहकाला केवायसी अद्ययावत करण्याचे संदेश पाठवीत नाही. कारण, पेटीएम ग्राहकांची माहिती केवायसी अ‍ॅप डाऊनलोड करताना घेतली जाते. ती माहिती कंपनीला पुरेशी असते. त्यामुळे ग्राहकांनी अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये. आम्ही यासंबंधीची माहिती विविध पोलीस ठाण्यांपर्यंतही  पोहचवीत आहोत. – ‘पेटीएम’शी संबंधित अधिकारी