04 August 2020

News Flash

श्रावणातील ‘आहारसंहिते’मुळे येऊरमध्ये शांतता

 ठाणे शहराला खेटून असलेल्या येऊरच्या निसर्गरम्य जंगलात दर पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ वाढत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

मद्यपी पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचा दावा

मांसाहार आणि मद्यपाटर्य़ासाठी ठाणे-मुंबईतील मंडळींचे हमखास ठिकाण असलेल्या येऊरच्या निसर्गरम्य परिसरात सध्या सुखद शांतता नांदत आहे. पावसाळय़ाच्या दिवसात येऊर परिसरात सहलींसाठी आलेल्या मद्यपींच्या हुल्लडबाजीला आवर घालण्याचे यंत्रणांचे प्रयत्न अपुरे ठरत असतानाच, श्रावण महिन्यातील ‘आहारसंहिते’मुळे येऊरच्या परिसरातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

ठाणे शहराला खेटून असलेल्या येऊरच्या निसर्गरम्य जंगलात दर पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ वाढत असतो. अनेक तरुण मद्यपान करत येऊरमधील धबधब्यांवर प्रवेश करत असतात. जंगलालगतच असणाऱ्या या परिसराचे पर्यटकांना आकर्षण असल्याने दिवसाही मद्यपान करत वेगाने दुचाकी चालवणे, येऊरच्या वळणावर मोठय़ाने हॉर्न वाजवत ध्वनिप्रदूषण करणे यामुळे पावसाळ्यात येऊरमध्ये अक्षरश गोंगाट असतो. या पार्श्वभूमीवर दरवर्षी पावसाळ्यात वन विभाग, पर्यावरण संस्था आणि पोलीस यांच्यामार्फत एकत्रित कारवाई केली जाते. यंदाच्या वर्षी वन विभागाच्या वतीने धबधब्यांच्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी तैनात करण्यात आले होते. तसेच पोलिसांतर्फे गटारीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिसांचे कारवाई पथक तयार करण्यात आले होते. गटारीच्या पार्श्वभूमीवर येऊर, वर्तकनगर, उपवन परिसरात मद्यपान करत वाहन चालवणाऱ्या तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे हा धुडगुस यंदा कमी झाला होता. त्यातच श्रावण सुरू झाल्यापासून हा निसर्गरम्य परिसर सुखद शांततेत न्हाऊन निघाला आहे.

श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार, मद्यपान वज्र्य करतात. त्यामुळे तरुण मंडळींच्या सहलींचे प्रमाणही कमी असते. हाच अनुभव सध्या येऊरमध्ये येत असल्याचे वन विभाग आणि पोलिसांनी सांगितले. पर्यटकांची गर्दी तुलनेने कमी झाल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वनअधिकारी राजेश पवार यांनी दिली. वर्तकनगर, येऊर, उपवन या परिसरात पावसाळ्यात जास्त खबरदारी घेऊन कारवाई करावी लागते. श्रावण सुरू झाल्यापासून मद्य प्राशन करत या परिसरात वावरणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे, असे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांनी सांगितले.

येऊर परिसरात गेल्या काही वर्षांत वन विभाग, पोलीस यंत्रणा आणि पर्यावरण संस्थांच्या पुढाकाराने उत्तम मोहीम राबवण्यात येत असल्याने येथील शांतता परतली आहे. या काळात पर्यटकांच्या गैरवर्तनावर नजर असल्याने रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने या सर्व यंत्रणांचा येऊरमध्ये ७ सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती येऊर एन्हव्हायर्न्मेंटल सोसायटीतर्फे देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:23 am

Web Title: peace in yeoor during shravans dietary stretch
Next Stories
1 पावलोपावली कोंडीचीच वळणे
2 सोनसाखळी चोरांना चाप
3 गणेशोत्सवात रस्ते प्रवास निर्विघ्न?
Just Now!
X