वर्षांला लाखोंचे उत्पन्न; विरार येथील युवकाचा अनोखा प्रयोग

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई: विरार येथील एका युवकाने चक्क घरात दागिन्यांची शोभा वाढविणाऱ्या मोत्यांची शेती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या मोत्यांना बाजारात चांगली मागणी असल्याने यातून उत्त्पन्न स्रोत विकसित झाला आहे.

विरार पूर्वेतील विजयनगर येथे राहणारे स्वप्निल साळवी यांनी हा मोत्यांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. याआधी स्वत: हॉटेल व्यवसाय करीत होते. परंतु त्यात खर्च अधिक व उत्पन्न कमी असल्याने त्यातून त्यांनी काढता पाय घेतला. पुढे स्वप्निल याने वैज्ञानिक पद्धतीने मोत्यांची शेती करता येऊ शकते. यासाठी त्याने ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर’ या शिंपल्याची शेती करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर २ वर्षे त्यावर संशोधन करून घरच्या घरी गोडय़ा पाण्यात मोत्यांची शेतीचा प्रकल्प उभारला.

घरातील ३ फूट रुंद व ५ फूट लांब इतक्या जागेत हा प्रकल्प उभारला आहे. यासाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपये इतका खर्च केला आहे. प्रकल्पात नैसर्गिक पद्धतीचे वातावरण तयार करून मोती तयार करण्याचे काम केले जात आहे. शिंपल्यामध्ये बाहेरील एखादा घटक गेला किंवा शिंपल्यात न्यूक्लिअर  बियाणे त्यात सोडून त्यावर प्रक्रिया केली जाते. हा मोती तयार होण्यासाठी एक ते दीड वर्षे इतका कालावधी लागतो. सध्या त्याने ५५० शिंपल्याची लागवड केली आहे. त्यातून साधारणपणे १ हजार ते बाराशे मोती निघणार असून यामध्ये पारंपरिक मोत्यांपासून विविध प्रकारच्या डिझाइनचे आकर्षित असे मोती तयार केले आहेत.

या तयार केलेल्या मोत्यांना देशासह परदेशात चांगली मागणी असून एका मोत्याची किंमत पाचशे रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत आहे. वर्षांला यामधून ८ ते १० लाख इतके वार्षिक उत्पन्न मिळू लागले आहे.

असा तयार केला जातो मोती

नदी किंवा समुद्रात सापडणाऱ्या शिंपल्याना घरात आणून त्यावर प्रक्रिया करून त्यात न्यूक्लेस बियाणे सोडले जाते व त्याची विशेष काळजी घेतली जाते. त्यात पाण्याचे तापमान, पी एच, अमोनिया, टीडीएस या साऱ्या गोष्टींवर लक्ष देऊन जसा आकार व ज्या प्रकारची कलाकृती असेल त्या कालावधीनुसार मोती तयार केला जातो.

जपानमध्ये मोत्यांची शेती अधिक केली जाते. भारतात त्याचे प्रमाण फार कमी आहे. मीसुद्धा याचा योग्य तो अभ्यास करून हा प्रकल्प सुरू केला आहे. यातून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. इतर शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा माझा प्रयत्न आहे. जेणेकरून याचा फायदा भविष्यात आपल्या देशाला व देशातील युवकांना मिळू शकेल

– स्वप्निल साळवी, मोती शेती व्यावसायिक