कल्याण, डोंबिवलीच्या रस्त्यांवरून चालणेही कठीण

कल्याण : अरुंद रस्ते, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडी यांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या कल्याण, डोंबिवली शहरांतील अरुंद रस्तेही फेरीवाल्यांनी बळकावल्याचे चित्र दिसून येत आहे. पालिकेने गेल्या वर्षी फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई करत स्थानक परिसरातून त्यांना हुसकावून लावले होते. तसेच या ठिकाणी अतिक्रमण कारवाई पथकही तैनात करण्यात आले होते. मात्र, या कारवाईचा आवेश आता ओसरला असून फेरीवाल्यांनी याचा गैरफायदा घेत पुन्हा रस्त्यांलगत व्यवसाय सुरू केला आहे.

फेरीवाल्यांच्या विळख्यात असलेले डोंबिवली स्थानक या गैरसोयीच्या प्रकारामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या कोणत्याही पादचारी पुलावरून बाहेर पडले तरी फेरीवाल्यांपासून काही सुटका होत नाही. सप्टेंबर २०१७ मध्ये मनसे आंदोलनकर्ते या शहरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. या कारवाईच्या वेळी स्थानक परिसरात अतिक्रमण कारवाई पथक तैनात करण्यात आले होते. या कारवाईच्या भीतीपोटी फेरीवाल्यांनी काही काळ स्थानक परिसर सोडला होता. मात्र आता पुन्हा डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरावर फेरीवाल्यांनी कब्जा केला असून अरुंद मार्ग आणि रस्त्याच्या दुतर्फा बसलेले फेरीवाले यामुळे नागरीकांना या परिसरातून चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. चिमणी गल्ली नावाने प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीच्या बाजीप्रभू चौकातील भाजी मंडई कित्येक वर्षे ना फेरीवाले क्षेत्रात भरत असली तरी प्रशासनाकडून यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. स्थानकाच्या १०० मीटरच्या पट्टय़ात फेरीवाल्यांना मनाई केल्यानंतर ही भाजी मंडई काही काळ दिसेनाशी झाली होती. मात्र पुन्हा फेरीवाल्यांनी आपल्या मालकी जागेप्रमाणे येथे मंडई भरवण्यास सुरुवात केली. डोंबिवलीच्या प्रसिद्ध मधुबन सिनेमाची गल्ली सायंकाळच्या वेळेला नागरिकांच्या वर्दळीमुळे गच्च झालेली असते.

कल्याण पूर्व-पश्चिम  परिसरातील फेरीवाल्यांना महापालिका आणि पोलीस प्रशासनाने थेट अभय दिल्याचे चित्र समोर आले आहे. गेली काही दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवल्याची चर्चा होत असताना कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी रस्ते अडवून आपल्या गाडय़ा लावण्याचा उद्योग सुरू केला आहे. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांना हटवण्यास जाणाऱ्या नागरिकांवर पोलीस तक्रारी करण्याबरोबरच नागरिकांना धक्काबुक्की करण्याचे प्रकारही घडू लागले आहे.

एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसर, रेल्वे पूल, स्कॉयवॉक परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला असला तरी कल्याण पुर्वेत असा पुढाकार कोणीच घेतला नाही. त्यामुळे येथे स्कायवॉक उतरणाऱ्या भागामध्ये फेरीवाल्यांनी नवीन बाजारपेठच खुली केली आहे.

विशेष म्हणजे या भागातील स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे या फेरीवाल्यांकडून नागरिकांना उपद्रव केला जात आहे.

‘क्या करेंगे पेट के लिए करना पडता है’..

सोयीसुविधांची आधीच बोंब असलेल्या दिवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान बसवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या शहरांच्या रेल्वे स्थानकाबाहेरील परीसरात रिक्षावाल्यांनी केलेल्या कोंडीमुळे त्रस्त झालेले नागरिक आता फेरीवाल्यांच्या अरेरावीला बळी पडू लागले आहेत. मुंब्रा येथील रेल्वे स्थानक परिसरात तर रोजरोसपणे सकाळ – सायंकाळ गुटखा विकणाऱ्या हातगाडय़ा उभ्या असतात. भाजीविक्रेते, फळविक्रेते, कापड विक्रेते यांनी या परिसराला घेरावच घातला आहे. दिवा शहराची परीस्थितीही काही वेगळी नाही. फेरीवाल्यांना या विषयी विचारणा केली असता ‘क्या करेंगे पेट के लिए करना पडता है ‘ असे उत्तर दिले जाते. आधीच चिंचोळे रस्ते असलेल्या या शहरांमध्ये फेरीवाल्यांमुळे नागरिकांना चालणेदेखील मुश्कील झाले आहे. फेरीवाल्यांनी केलेल्या या कोंडीमुळे काही अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न संतप्त दिवा-मुंब्रावासीयांनी उपस्थित केला आहे.