भिवंडी महापालिकेची तिजोरी भरली

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांची तारांबळ सुरू असताना या नोटा कररूपात स्वीकारण्याच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची गंगाजळी मात्र भरू लागली आहे. जवळपास १५ दिवसांपूर्वी कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार आणि ठेकेदारांची बिले चुकवण्याइतपत रक्कम तिजोरीत नसल्याने डबघाईला आलेल्या भिवंडी महापालिकेला गेल्या तीन दिवसांत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांच्या रूपात तब्बल साडेआठ कोटी रुपयांचा कर मिळाला आहे. थकीत कर भरून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांपासून सोडवणूक करण्यासाठी नागरिकांचा ओघ सुरूच असल्याने पालिकेचे उत्पन्न आणखी वाढण्याची  शक्यता आहे. भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प ६५० कोटींच्या घरात असून शासनाकडून पालिकेला वर्षांकाठी एलबीटीपोटी २२५ कोटीचे अनुदान मिळते. तसेच मालमत्ता, पाणी तसेच विविध करांपोटी महापालिका उत्पन्नाची रक्कम अपेक्षित धरते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध करांची अपेक्षित वसुली होत नव्हती. त्यात खर्चावरही कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पालिकेला कर्जापोटी १८ कोटी रुपये वर्षांला भरावे लागतात. ठेकेदारांची १३० कोटींची देणी शिल्लक आहेत. याशिवाय, महापालिकेत साडेचार हजार कर्मचारी असून त्यांच्या पगारावर महिन्याला १४ कोटी रुपये खर्च होतात. किमान कर्मचाऱ्यांच्या पगाराइतपत रक्कम पालिकेच्या तिजोरीत असणे अपेक्षित असते. मात्र, जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराइतपत रक्कमही पालिकेच्या तिजोरीत नव्हती. त्यामुळे यंदा दिवाळीपूर्वी पालिकेने कर्मचाऱ्यांना बोनस तर दूरच महिन्याचा पगारही दिलेला नव्हता. परिणामी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलनही सुरू केले होते. परंतु, पालिका प्रशासनाने ‘मेस्मा’ लागू करण्याचा निर्णय घेताच ११ नोव्हेंबरपासून कर्मचारी कामावर परतले आहेत.

परंतु, आता पालिका प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची चिंता मिटण्याची शक्यता आहे. भिवंडी महापालिकेने विविध करांच्या देयकांसाठी चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केली असून गेल्या तीन दिवसात महापालिकेच्या तिजोरीत साडे आठ कोटी रुपये जमा झाले आहेत. या नोटांच्या माध्यमातून थकीत कराची रक्कम भरण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतील रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने विविध करांच्या देयकांसाठी चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात पालिकेच्या तिजोरीत साडे आठ कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने तिजोरीतील रकमेत आणखी वाढ होऊ शकेल.  -डॉ.योगेश म्हसे, भिवंडी महापालिका, आयुक्त