चिकणमातीच्या गणेशमूर्तीची खरेदी करण्याकडे कल; शाडूमातीला स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध
गणेशमूर्तीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमतींच्या पाश्र्वभूमीवर स्वस्त आणि सुबक अशा लाल रंगाच्या चिकणमातीच्या गणेशमूर्तीना पसंती मिळू लागली असून या मूर्तीना यंदा मोठी मागणी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षाही कमी किमतीमुळे उपलब्ध होणाऱ्या या गणेशमूर्तीमुळे नागरिकांना महागाईच्या काळात दिलासा मिळत आहे. पाचशे रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत या मूर्तीची उपलब्धता होत असून एक ते दीड फुटांच्या या मूर्तीची सुबकपणामुळे नागरिक आकर्षित होत आहेत. पूर्वी गणेशोत्सवाच्या काळात अशाच चिकणमातीच्या गणेशमूर्तीची घरोघरी निर्मिती केली जात होती. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आगमनामुळे या मूर्ती बनवण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र महागाईच्या काळात या पारंपरिक गणेशमूर्तीचा दिलासा नागरिकांना मिळत आहे. ठाणे, मुंबईतील मूर्तिकारांनी लाल गणेशमूर्ती बनवण्यास सुरुवात केली असून त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पूर्वी कोकणातील गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक घरामध्ये शेतातील चिकणमाती आणून त्याची मूर्ती बनवली जात होती. स्वस्त असलेला हा पर्याय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे मागे पडला होता.
शाडूच्या मातीच्या मूर्तीकडे नागरिक मोठय़ा प्रमाणात आकृष्ट झाल्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्तीची अधिक खरेदी होत आहे. मात्र या मूर्तीच्या किमती जास्त असल्यामुळे त्याचा फटका नागरिकांच्या खिशाला बसतो. गुजरातमधील भावनगर येथून शाडूची माती आणून पेण, पनवेल आणि आमरापूरकर या गावांमधून महाराष्ट्रभर वितरित केली जाते. या मातीची खरेदी, वाहतूक आणि मळण्याचा खर्च पाचशेहून अधिक होत असल्यामुळे शाडूच्या मातीची सर्वात छोटी मूर्ती किमान एक हजार ते १२०० रुपयांपासून सुरू होते.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरातील अनेक मूर्तिकारांनी लाल मातीच्या मूर्तीची निर्मिती करण्यास सुरुवात केली असून त्यांना ग्राहकांचाही चांगला पाठिंबा मिळू लागला आहे, अशी माहिती मंगलमूर्ती डॉट कॉमचे महेश कदम यांनी सांगितले.

लाल माती आणि त्यात कापसाचे मिश्रण केल्यामुळे ती अधिक मजबूत बनते. शिवाय पाण्यामध्ये अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्ये विरघळून जाते. त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही. लाल मूर्ती कृत्रिम रंगाशिवाय आकर्षक ठरत असून ग्राहकांच्याही पसंतीला उतरत आहेत.
– केदार विंदे, मूर्तिकार