tapaschakraक ल्याण परिसरातील झोपडपट्टय़ा, डोंगर-टेकडय़ांवरील वस्त्यांमध्ये आजही झोपडीदादा आणि गर्दुल्ल्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या भागात अंमली पदार्थ आणि नशा आणणाऱ्या औषधांची विक्री होण्याचे प्रमाण जास्त आहे. या नशेच्या अधीन गेल्याने परिसरातील अनेक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. पण कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेने या प्रकाराकडे डोळेझाक केली. पण आपल्या डोळय़ांदेखत मुले व्यसनाधीन होत असल्याचे पाहून एका भागातील रहिवासी एकवटले आणि त्यांनीच नशेचा व्यापार करून तरुण पिढीला अंधाराकडे नेणाऱ्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवून दिला. 

काही महिन्यांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सबिना शेख नावाची महिला नशेची औषधे विकण्याचा व्यवसाय करायची. ठरलेली गिऱ्हाईके नियमितपणे तिच्याकडे येऊन ही औषधे घेत असत. सबिनाच्या कृत्याची जाणीव असूनही स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे सर्वसामान्यांना व्यसनांध बनवण्याचा हा व्यवसाय बिनदिक्कत सुरू होता. अशातच सबिनाकडे नशेची औषधे घेण्यासाठी येणाऱ्या एका तरुणाला आपल्या चुकीची जाणीव झाली. हे व्यसन अनेकांचे संसार उद्ध्वस्त करते. तरुण पिढीला बरबाद करते, याची जाणीव झाल्याने त्याने नशापाणी करण्याचे सोडून दिले. पण एवढय़ावरच न थांबता त्याने पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या गैरव्यवसायाची माहिती दिली. त्याच्या या सतर्कतेमुळे सबिनाला अटक झाली आणि नशेचा हा व्यापार बंद झाला. पोलिसांच्या या कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत होते. मात्र, नशेचा व्यापार एकीकडून बंद झाला तरी दुसरीकडे तो सुरळीत चालू होता. कल्याणमधील गोविंदवाडी-बैलबाजार आणि मुरबाड रस्त्यावरील सिंडिकेट भागात नशा आणणारी औषधे विकण्याचे अड्डेच तयार झाले होते. त्यामुळे कल्याणमधील नशेच्या अधीन गेलेल्यांची पावले या भागाकडे वळू लागली. साहजिकच या परिसरातील तरुण मंडळीही या व्यसनाच्या गर्तेत अडकत गेली. सकाळी घरातून गेलेला आपला मुलगा बाहेर मित्रांच्या सोबत राहतो आणि रात्री उशिरा तारवटलेले डोळे करून घरी येतो, हे पाहून या परिसरातील तरुणांच्या आई-वडिलांना मोठा घोर लागला. आपल्या भागात सुरू असलेल्या अड्डय़ांमुळेच आपली मुले बिघडत चालली आहेत, असे लक्षात आल्याने या पालकांनी नशेचे अड्डे हटवण्यासाठी संघर्ष सुरू केला. पण हा व्यापार करणारे कुख्यात गुन्हेगार असल्याने त्यांनी रहिवाशांनाच धमकावण्यास सुरुवात केली. उमर शेख, सलमान शेख, सलमा शेख आणि कासीम शेख या चौघांनी नशेच्या औषधांचे सिंडिकेट, बैलबाजार भागात अड्डे उघडले होते. भिवंडी, मुंब्रा, कळवा भागांतून ही औषधे खरेदी करण्यासाठी व्यसनी लोक येत होते. या प्रकरणी रहिवाशांनी पोलीस ठाण्यातही धाव घेतली. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. याच दरम्यान या भागातील आलमगीर ऊर्फ पापा या तरुणाचा नशेच्या औषधाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. या घटनेने रहिवाशांच्या संघर्षांची धार अधिक तीव्र केली.
एक दिवस सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन सलमान शेखला गाठले व अड्डा बंद करण्यासाठी बजावले. मात्र, सलमानने त्यांना दमदाटी व मारहाण केली. या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर सलमानला अटक करण्यात आली. मात्र, दोनच दिवसांत तो सुटून बाहेर आला व दादागिरी सुरू केली. आपल्याला अडचणीत आणणाऱ्यांना ‘बघून घेईन’ अशा धमक्याही तो देऊ लागला. त्यामुळे रहिवाशांसमोर संकट उभे राहिले.
सलमान हा मुंबई पोलिसांचा खबऱ्या असल्याने पोलीस त्याला अटक करीत नाहीत, अशी माहिती विजय पाटोळे या रहिवाशाला मिळाली होती. त्यामुळे धास्तावलेल्या रहिवाशांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर, प्रभुनाथ भोईर यांच्याकडे धाव घेत त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. देवळेकर आणि भोईर यांनीही लगेच महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांच्याकडे तक्रार केली. या समाजकंटकांना पोलिसांची साथ कशी मिळते, हेही त्यांच्यासमोर सांगण्यात आले. तसेच या घटनेची दखल घेतली नाही तर, ठाणे पोलीस आयुक्तांकडे जाऊ, असा इशाराही देण्यात आला. राजकीय दबावामुळे पोलिसांनाही मग वेगाने हालचाल करावी लागली. पोलिसांनी सिंडिकेटमधील ही चौकडी राहत असलेल्या घरात छापा टाकला. तेथे दोन गोण्यांत भरलेल्या नशेच्या चारशे बाटल्या जप्त करण्यात आल्या असून उमर शेख याला तडिपार करण्यात आले आहे.