ठाणे शहरात दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘प्रीपेड रिक्षा’ सेवेस आतापर्यंत जेमतेम ६८५ प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे. शहरातील रिक्षा प्रवासाचा आवाका लक्षात घेता या नव्या प्रयोगास ठाणेकरांनी फारशी साथ दिली नसल्याचे चित्र असून प्रीपेड रिक्षांचे महागडे दर त्यास कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, या सेवेस महिलांकडून काहीसा प्रतिसाद मिळत असून ६८५ प्रवाशांमध्ये ४७९ महिलांचा समावेश आहे. ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच अन्य प्रवाशांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ठोस उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून यासाठी शहरातील सर्वच रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्यात येत आहेत.
ठाणे शहरातील काही गैरप्रकारांमुळे महिलांचा रिक्षाप्रवास काहीसा धोकादायक ठरू लागला होता. यामुळे महिलांच्या सुरक्षीत प्रवासाकरिता ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दोन महिन्यांपूर्वी ‘प्रीपेड रिक्षा’ योजना राबविण्यास सुरुवात केली.    मात्र, प्रवासाचे दर काहीसे महाग असल्याने ही सेवा कुणाला परवडणार, अशी ओरडही सुरू झाली होती. त्यामुळे ही योजना कितपत यशस्वी ठरू शकेल याबाबत साशंकता असतानास मागील दोन महिन्यात या सेवेस फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र पुढे आले आहे. गेल्या महिनाभरात या योजनेचा फायदा २१७ प्रवाशांनी घेतला असून त्यामध्ये सुमारे १४० महिला प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे प्रीपेड रिक्षाचा प्रवास काहीसा महाग असला तरी महिला सुरक्षित प्रवासाकरिता त्याकडे वळू लागल्याचे उघड झाले आहे. मात्र २१७ हा आकडा प्रवाशी संख्येच्या तुलनेत काहीसा कमी आहे.
दुसऱ्या महिन्यात प्रीपेड रिक्षातून ४६८ प्रवाशांनी प्रवास केला असून पहिल्या महिन्याच्या तुलनेत प्रवाशी संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. मात्र, शहरातील प्रवाशी संख्येच्या तुलनेत ४६८ प्रवाशांचा आकडा कमीच असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या योजनेस दोन महिने उलटूनही प्रवासी वर्गाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. महिलांच्या सुरक्षित प्रवासाची हमी देणारी ही योजना अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ठोस उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

*  गेल्या दोन महिन्यांत ६८३ प्रवाशांनी प्रीपेड रिक्षा योजनेचा लाभ घेतला असून त्यामध्ये ४६८ महिला प्रवाशांचा समावेश आहे.
* पहिल्या महिन्यात २१७ प्रवाशांनी प्रीपेड रिक्षातून प्रवास केला होता. दुसऱ्या महिन्यात ४६८ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
* दोन महिन्यांतील आकडेवारी पाहता प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली असून सुरक्षित प्रवासाकरिता महिला या योजनेकडे वळू लागल्या आहेत.
* ही योजना सक्षम करण्यासाठए शहरातील सर्वच रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठक घेण्यात आली असून त्यांना या योजनेकरिता रिक्षा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.