दिवा-वसई मार्गावर धावणारी पनवेल-वसई ही मेमू गाडी कोपर अप्पर रेल्वे स्थानकात वेळेआधी आल्याने आणि ती स्थानकाच्या अलीकडेच थांबल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी अर्धा तास ‘रेल रोको’ केला. या वेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला पांगवल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानकात १०० ते सव्वाशे प्रवासी उतरले होते.

मेमू गाडी वेळेआधी आल्यानंतर ती स्थानकातच थांबविण्यात आली असती तर प्रवाशांना गाडीत आरामात चढता आले असते; परंतु रेल्वे प्रशासनाने गाडी मध्येच थांबवून चूक केली. त्यामुळे प्रवाशांना तिष्ठावे लागले, असा आरोप प्रवाशांनी केला. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; प्रवाशी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने रेल्वे पोलिसांना पाचारण करावे लागले.
भिवंडी येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. बहुतेक प्रवासी या स्थानकातून गाडी पकडतात. त्यामुळे येथे गर्दी होते. रेल रोकोमुळे प्रवाशांना कामाची वेळ गाठता आली नाही.

पनवेल-वसई मेमू वेळेआधी आल्याने रेल्वे स्थानकात तिला सिग्नल मिळाला नाही. यामुळे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे थांबली. सिग्नल यंत्रणा दिव्याजवळ असल्याने काही करता येत नाही.
– संजय गुप्ता, स्थानक मास्तर