छताचे काम संपून पाच महिने उलटले तरी अवजड साहित्य पुलावरच

ठाणे सॅटिसवरील छताचे काम गेली दीड वर्षांपासून सुरू असून ऑगस्ट २०१५ मध्ये पूर्ण होणारे काम जानेवारी २०१६ उजाडले तरी अद्याप पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे नागरिकांना जिवावरचा धोका पत्करून सॅटिसवरून प्रवास करावा लागतो. सॅटिस कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी पाइपच्या भव्य शिडय़ांमुळे नागरिकांना अडथळा सहन करावा लागत आहे. शिवाय या शिडय़ांमुळे अपघातही होण्याची शक्यता असल्याने सॅटिसवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. मात्र त्यानंतर पाच महिन्यांहून अधिक काळ उलटला असून नवे वर्षही सुरू झाले आहे, तरी काम सुरूच असून विद्युत विभागाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या लोखंडय़ा अवजड शिडय़ा तशाच ठेवण्यात आल्या आहेत.

ठाणेकरांचे ऊन आणि पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने सॅटिसवरील बस थांब्यांवर छत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मोठा गाजावाजा करीत स्थानिक आमदारांच्या निधीतून आणि महापालिकेच्या अखत्यारीखाली या कामाला सुरू झाली. कामाचे भूमीपूजन झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि पुढे तर दिलेल्या वेळेत तीन ते चार वेळा बदल करून तारीख वाढवण्यात आली. मात्र त्यावरील विद्युत विभागाच्या कामाची अद्याप पूर्तता झालेली नाही.

हे काम सुरू झाल्यापासून उभारण्यात आलेले लोखंडी पाइपच्या शिडय़ा काम पूर्ण होत नसल्याने अद्याप सॅटिसवरच कायम आहेत. चांगल्या सुविधेसाठी अडचणी सहन करण्याची तयारी असणाऱ्या ठाणेकरांची इथे मात्र कुचंबणाच सुरू आहे. या शिडय़ा तात्काळ हटवण्याची मागणी होऊ लागली आहे. याविषयी महापालिकेचे अभियंता विनय वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता सॅटिसचे काम पूर्ण झाले असून केवळ विद्युत विभागाचे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये या लोखंडी शिडय़ा हटवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कासवापेक्षा मंदगती

सॅटिससारख्या सार्वजनिक ठिकाणी उभे राहणारे देशातील सर्वात मोठे छत, अशी शेखी मिरवणाऱ्या ठाणे महापालिकेने हे काम पूर्ण करण्यासाठी दिलेल्या डेडलाइन न पाळण्याचाही विक्रम केला आहे.या छताच्या कामाच्या वेगामध्ये महापालिकेने कासवालाही मागे टाकले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाण्यातील प्रवासी किरण भंडारे यांनी दिली.