वसईतील फुलविक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्या वापरण्यास राज्य शासनाकडून परवानगी

प्लास्टिक बंदीमुळे फुलांची बांधणी (पॅकिंग) करता येत नसल्याने वसईतील हजारो फूल बागायतदारांची मोठी समस्या निर्माण झाली होती. वसईतील शेतकऱ्यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून विनंती केल्यानंतर राज्य सरकारने फुलांच्या बांधणीसाठी प्लास्टिक पिशव्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबतचे आदेश जारी करण्यात येणार आहेत. यामुळे वसईतील हजारो फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. वसईतील फूल बागायतदारांना फुलांची बांधणी ही प्लास्टिक पिशव्यांमध्येच करावी लागते. वसई तालुक्यात पाच हजारांहून अधिक शेतकरी फुलांची शेती करतात. वसईतून दररोज चाफा आणि जास्वंदाचे १५ लाख नगाच्या आसपास उत्पादन होते. ही फुले दादरच्या बाजारात नेली जातात. त्याचप्रमाणे मोगरा, जुई, सायली, तगर ही फुले प्लास्टिक पिशवीत बांधली जातात. वसईतून दररोज मुंबईत शेकडो किलो फुले विक्रीसाठी पाठवली जातात. या फुलांची बांधणी प्लास्टिकच्या जाड पिशवीत केली जाते.

नगावर विकली जाणारी फुले म्हणजे शेकडय़ांच्या हिशेबाने असलेल्या फुलांची बांधणी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. चाफा आणि जास्वंद ही देवाला वाहिली जाणारी फुले आहेत. त्यांची बांधणी करण्यासाठी कागदी पिशव्यांचा उपयोग होत नव्हता.

फुलांच्या बांधणीला पर्याय नसल्याने वसईतील फूल उत्पादक शेतकरी प्लास्टिकच्या पिशव्यांमधूनच फुले मुंबईला नेत होते. परंतु त्यावर मुंबई पालिकेकडून कारवाई केली जात होती. बंदीनंतर शासनाने किराणा दुकानदारांना पाव किलोपर्यंतच्या सामानाच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशव्यांना परवागनी दिली होती. तशी परवानगी फूल बागायतदारांना द्यावी, अशी मागणी वसईतील शेतकऱ्यांनी पर्यावरणमंत्र्यांकडे केली होती. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली वसईतील शेतकरी सुभाष भट्टे, वासुदेव पाटील, महेंद्र पाटील, पुरुषोत्तम कडू पाठपुरावा करीत होते. पर्यावरण विभागाचे सचिव डिग्गीकर यांनी बांधणीसाठी प्लास्टिक पिशव्या वापरण्यास परवागनी दिल्याची माहिती अर्नाळा येथील शेतकरी किरण पाटील यांनी सांगितले.

येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. आमचा प्लास्टिकला विरोध आहे. पण सक्षम पर्याय मिळेपर्यंत आम्हाला प्लास्टिक पिशव्या पॅकिंगला वापरू द्या, अशी आमची मागणी होती असे पाटील यांनी सांगितले.

कागदी पिशव्यांची अडचण

फुले नाशवंत असतात. संध्याकाळपर्यंत ती कोमेजून जातात. सकाळी दव पडत असल्याने फुले ओली असतात. तसेच दिवसभर ती टवटवीत राहण्यासाठी पाणी शिंपडावे लागते. यामुळे कागदी पिशव्या फाटून जातात. वसईतून उत्पादन होणारी फुले नगावर विकली जात असल्याने ती प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच बांधून मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी नेली जातात. कागदी पिशव्या ओल्या होऊन फाटतात. त्यामुळे प्लास्टिकने बांधणी करावी लागते. या प्लास्टिकला अद्याप पर्याय मिळाला नसल्याने फूल बागायतदारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. वसई विरारमधून मोगऱ्याचे सर्वाधिक उत्पादन होते. दररोज एक हजार किलो मोगरा मुंबईत जातो. मोगरा किलोवर विकला जात असल्याने तो कापडी पिशवीत नेला जाऊ  शकतो. परंतु चाफा, जास्वंद आदी नगावर विकला जात असल्याने तो कापडी पिशवीत शक्य नाही. कागदी पिशव्या ओल्या होतात. कापडी पिशवीत शंभर नग भरले तर वजन वाढते आणि ती वाकतात, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.