News Flash

प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे साक्षेपी संशोधक

उतारवयात एखाद्या विशिष्ट विषयाचा ध्यास घेऊन निवृत्तीनंतरच्या काळात स्वत:चे मन रमविण्याबरोबरच फार मोठे भरीव काम करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे अंबरनाथचे लक्ष्मणराव कुलकर्णी.

| August 19, 2015 01:50 am

प्रासंगिक
उतारवयात एखाद्या विशिष्ट विषयाचा ध्यास घेऊन निवृत्तीनंतरच्या काळात स्वत:चे मन रमविण्याबरोबरच फार मोठे भरीव काम करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे अंबरनाथचे लक्ष्मणराव कुलकर्णी. अलिकडेच पुण्यात वयाच्या ८९ व्या वर्षी झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली आणि एका चिरतरुण आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाचे ऐहिक जगातील पर्व संपले. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या साक्षेपी संशोधकाच्या कार्याचा आढावा घेणारा श्रद्धांजलीपर लेख..
अतिशय रुबाबदार, बोलण्यात सदा मिश्किील भाव, कोणत्याही संभाषणाचा समारोप एखाद्या विनोदाने करणारे लक्ष्मणराव उर्फ काका कुलकर्णी तब्बल ७५ वर्षे अंबरनाथमध्ये राहत होते. अंबरनाथमध्येच त्यांचे शिक्षण झाले. अंबरनाथचे शिवमंदिर हा त्यांचा अगदी लहानपणापासूनच आवडीचा विषय. भाभा अणू संशोधन केंद्रात अधिकारीपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले सारे लक्ष मंदिराकडे केंद्रीत केले. मंदिराचा त्यांनी अभ्यास सुरू केला. दररोज सकाळ-संध्याकाळ मंदिर परिसराला भेट देणे, तेथील शिल्पशिळांचे निरीक्षण, रेखाटने, संबंधित ग्रंथांचे वाचन यातून त्यांनी मंदिराचे खरेखुरे महात्म्य जाणून घेतले. त्याआधी सर्वसामान्य नागरिकांना मंदिराविषयी फारशी माहिती नव्हती. ‘पांडवांनी बांधलेले मंदिर’ अशी अत्यंत चुकीची अख्यायिका प्रचलीत होती. मंदिराविषयीचा हा गैरसमज दूर होण्यास लक्ष्मणराव कुलकर्णी यांचे फार मोठे योगदान आहे. संस्कृत आणि मोडी या भाषा त्यांना अवगत होत्या. त्यामुळे याविषयी प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ तपासणे त्यांनी सोपे गेले. या सर्व संशोधनावर आधारित त्यांनी मंदिराविषयीचे संशोधन मांडणारे सचित्र पुस्तक लिहिले. त्यापूर्वी मंदिराविषयी दोन छोटय़ा पुस्तिका प्रकाशीत झाल्या होत्या, पण खऱ्या अर्थाने साक्षेपी नोंद घेणारे पहिले पुस्तक लक्ष्मणराव कुलकर्णी यांनीच लिहिले. गिरीश त्रिवेदी यांच्या साप्ताहिक ‘आहुति’ तसेच अरुण मैड संपादित शिवंदिरविषयक ग्रंथांमध्येही लक्ष्मणराव कुलकर्णी यांचे लेख होते. डॉ. कुमुद कानिटकर यांनी अंबरनाथ शिवालयाविेषयी लिहिलेल्या ग्रंथाचे या मंदिराची ख्याती जगभर पोहोचवली. त्यांच्या या ग्रंथास आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
अंबरनाथमधील एज्युकेशन सोसायटीने भरविलेल्या इतिहास परिषदेत डॉ. देगलूरकर, डॉ. जामखेडकर आदी तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत लक्ष्मणराव कुलकर्णीनी अतिशय आत्मविश्वासाने मंदिराची महती कथन केली.
मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या दगडी तुळईवर नागरी आणि संस्कृत भाषेत लिहिलेला शिलालेख लक्ष्मणरावांनी तज्ज्ञांच्या लक्षात आणून दिला. शिलाहार राजा माम्वाणी याने लिहिलेल्या या शिलालेखावर शक संवंत ९८२, श्रावण शुद्ध ९ शुक्रे असा कालनिर्देश आहे. म्हणजेच श्रावण शुद्ध नवमी, इ.स. १०६० मध्ये हे मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या कालनिश्चचेविषयी प्रचलीत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी अंबरनाथकरांनी श्रावण महिन्यात येणारा वर्धापन दिन साजरा करावा, ही लक्ष्मणराव कुलकर्णीचीच सूचना. गेली आठ वर्षे अंबरनाथकर नियमितपणे श्रावण शुद्ध नवमीला मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतात.
शिवमंदिराबरोबरच ‘ज्ञानेश्वरी’ हासुद्धा लक्ष्मणराव कुलकर्णीचा अभ्यास विषय होता. ज्ञानेश्वरीतील रूपके, अलंकारिक रचना, प्रासादिकता व तत्त्वज्ञान यावर ते अतिशय सुंदर भाष्य करीत. अंबरनाथमधील नागरिक सेवा मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ आदी विविध संस्थांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. अंबरनाथ पालिकेनेही ‘सहस्त्रकातील मानकरी’ म्हणून त्यांचा गौरव केला होता. वृद्धापकाळी आप्तस्वकियांच्या सहवासाच्या इच्छेने २०१२ मध्ये ते पुण्यात स्थायिक झाले. मात्र मनाने ते सदैव अंबरनाथमध्येच होते. आपल्या बोलघेवडय़ा आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने त्यांनी पुण्यातही मित्रांचा गोतावळा जमविला होता. मृत्यूच्या आदल्या दिवशीही पुण्यात एका समारंभात त्यांनी तब्बल ४० मिनिटे ज्ञानेश्वरीवर निरूपण केले. कुणाचाही निरोप घेताना कधीही ‘जाता हसवून जातो’ असे म्हणून एखादा विनोद सांगणारे कुलकर्णीकाका मृत्यूलाही अगदी सहज आणि शांतपणे सामोरे गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 1:50 am

Web Title: personality researchers
Next Stories
1 श्रावणमासी.. उत्साही लगबग!
2 डोंबिवलीत उद्या रिक्षा बंद?
3 ठाणे, डोंबिवलीत पर्यावरणस्नेही नागपूजा
Just Now!
X