दीड महिन्यात ४९ श्वानांना बाधा
पावसामुळे सामान्य व्यक्तींमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण बळावल्याचे चित्र असताना मुक्या प्राण्यांनाही आजारांची बाधा झाल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत डोंबिवली, कल्याणमधील ४९ श्वानांना साथीच्या रोगांची बाधा झाली आहे. कॉलरा, कावीळ, त्वचारोगांचे प्रमाण श्वानांमध्ये बळावले असून पावसामुळे होणारे दमट वातावरण आणि प्राण्यांना सांभाळणाऱ्यांचे अपुरे ज्ञान यामुळे प्राण्यांच्या आजाराचे प्रमाण बळावल्याचे पशुवैद्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे परदेशी जातींपैकी लॅबरेडोर, पोमेरेनिअन आणि डॉबरमन या जातीच्या श्वानांच्या पिल्लांना आजार होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.
दूषित पाणी, दमट वातावरण अशा तापमानाचा माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही त्रास होत असतो. पाळीव प्राण्यांमध्ये परदेशी जातीचे श्वान पाळण्याचे प्रमाण अधिक आहे. परदेशी जातीच्या श्वानांना भारताचे तापमान सहन होत नसल्याने पावसाळा ऋतूमध्ये श्वानांना होणारे आजार अधिक बळावतात. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे डोंबिवली, कल्याण परिसरांतील ३५ श्वानांना त्वचेचे आजार, १० श्वानांना कॉलरा, तर ४ श्वानांना कावीळ अशा आजारांची लागण झालेली आहे. शहरातील रस्त्यावर असणारा कचरा, अस्वच्छता यामुळे
आजार बळावल्याचे पशुवैद्यांकडून सांगण्यात आले आहे. श्वानांच्या बोटांमध्ये, पायांमध्ये पाण्याचा ओलसरपणा राहिल्याने त्वचेचे आजार भेडसावतात. तसेच दूषित पाणी, दमट वातावरण यामुळे श्वानांना उलटय़ा, पोटाचे विकार, कावीळ अशा आजारांची लागण होत आहे. परदेशी जातींपैकी जास्त केसाळ श्वानांना हे आजार अधिक होत असल्याची माहिती पुढे येत आहे. शरीरावर जास्त प्रमाणात केस असल्याने श्वानांचे शरीर पाण्यामुळे ओलसर राहिल्यास केसांच्या आतील त्वचा कोरडी होत नाही. लॅबरेडोर आणि पोमेरेनिअन जातीच्या श्वानांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने या जातीच्या श्वानांना पावसाळ्यात अधिक आजार भेडसावतात. केस ओले राहिल्याने कोंडा होऊन खाज सुटत असल्याने श्वानांच्या शरीरावर जखमा होतात. यात पावसाचा दमटपणा वातावरणात असल्याने कावीळ, कॉलरा, डिहायड्रेशन होणे यांसारखे आजार श्वानांना होत असल्याचे दिसून येत आहेत.

पावसाळ्यात श्वानांची काय काळजी घ्यावी?
योग्य आहार आणि घरातील स्वच्छता याकडे श्वानमालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
कडुलिंबाचा पाला, तेल यांचा उपयोग श्वानांचे शरीर स्वच्छ करण्यासाठी होतो. श्वानमालकांनी या आयुर्वेदिक उपचाराचा अवलंब करावा.
श्वानांचे वास्तव्य असलेली जागा कोरडी असावी.
पाऊस असल्याने श्वानांना आंघोळ न घालणे असा गैरसमज काही श्वानमालकांमध्ये असतो. तसे न करता श्वानांना नियमित आंघोळ घालणे, शरीर स्वच्छ, कोरडे करणे श्वानांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असते.

बाहेरचे खाद्यपदार्थ देऊ नयेत
राहणीमान बदलल्यामुळे श्वानमालक श्वानांना बाहेरचा विकत घेतलेला तयार आहार देतात. मात्र हा आहार श्वानांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत असून श्वानांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. लहान पिल्लांना बाजारात न विकता सुरुवातीची काही वर्षे दूध पुरवणे आवश्यक असते. त्यामुळे श्वानांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसाळ्यात श्वानांचे पालन करण्याचे अपुरे ज्ञान यामुळे श्वानांच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या श्वानांना सलायन लावावे लागते. अनेकदा श्वानांचा जीव वाचवण्यात अडचणी येतात.
– पशुवैद्य डॉ. मनोहर अकोले, अध्यक्ष, वेटरनरी प्रॅक्टिशनर वेलफेअर असोसिएशन