‘रोटरी क्लब ऑफ अपटाउन’ संस्थेतर्फे २२ नोव्हेंबरला आयोजन
अफगाणिस्थानमध्ये आढळणारा अफगाण हाउंड डॉग, सायबेरियातील सायबेरियन हास्की, थंड प्रदेशातील न्यू फाउंड लॅण्ड, सेंट बर्नाडर तर उंदराइतक्या छोटय़ा आकाराचा चुंवा हुवा डॉग अशा अत्यंत वैविध्यपूर्ण प्रजातीचे श्वान पाहण्याची संधी डोंबिवलीकरांना उपलब्ध होणार आहे.
गेल्या सहा वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा यंदा २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळात डोंबिवलीतील स. वा. जोशी शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ३० प्रजाती (ब्रिड)चे आणि दीडशेहून अधिक श्वान स्पर्धक या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अपटाउनचे उपाध्यक्ष सुधीर यमगर यांनी दिली.
घरातील पाळीव श्वानाकडे कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य म्हणून पाहिले जाते. अशा श्वानांच्या सौंदर्याची आणि त्यांच्या कौशल्यांची ओळख शहरवासीयांना व्हावी या उद्देशाने डोंबिवलीतील रोटरी क्लबच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून श्वानांची सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत आणि श्वानांची पुरेशी तपासणी करून या स्पर्धेतील विजेत्या श्वानांची निवड करण्यात येते. याशिवाय यातील प्रशिक्षित श्वान आपल्या कौशल्यांचे दर्शन घडवण्याबरोबरच आपल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत असतात. पाळीव प्राण्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये शेवटच्या सत्रामध्ये श्वानांची सौंदर्य स्पर्धा घेतली जात असून वेगवेगळ्या वेशभूषेसह श्वानांचे मालक या स्पर्धेत आपले सादरीकरण करतात. यंदा या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अजिंक्य देव उपस्थित राहणार आहेत. तर डोंबिवली शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप..
डोंबिवली शहरातील प्राणीप्रेमींना वेगवेगळ्या प्रजातीचे श्वान पाहण्याची संधी मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्य़ांतील शहरांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असून दरवर्षी प्रथम येणाऱ्या दीडशे श्वानांना या स्पर्धेत सहभाग देण्यात येतो. यातील प्रत्येक विजेत्याला सहभाग प्रमाणपत्र मिळत असले तरी त्यातील ५० श्वानांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. नेपोलियन मॅस्टीफ, रॉटविलर, लॅब्रोडोर, ल्हासा, जर्मन शेफर्ड, डॅलमिशन, डॉबरमॅन, गोल्डन रिट्रीव्हर, पॉमेरिअन, ग्रेटडेन, क्रॉकर स्पॅनियल, पग, हॉवर्ड अशा नानाविध ३० प्रजाती या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेस दरवर्षी सुमारे ४ हजारांहून अधिक प्रेक्षक भेट देत असतात.