श्वानांमध्ये काही श्वानांनी आपल्या विशिष्ट गुणवैशिष्टय़ांमुळे आपली ओळख सिद्ध केली आहे. घरात विरंगुळ्यासाठी पाळला जाणारा एखादा श्वान टॉय ब्रीड म्हणून ओळखला जातो, तर घराच्या रक्षणासाठी पाळणारे श्वान आपल्या रुबाबी व्यक्तिमत्त्वाने आपली छाप पाडतात. विविध जातींच्या श्वानांपैकी जनमानसात आपली दहशत सिद्ध करणारे श्वान म्हणजे ‘रॉटवायलर’. मूळ जर्मनीमधील असलेले रॉटवायलर आपल्या रुबाबी स्वभावामुळे सध्या जगभरात प्रसिद्ध आहेत. राखण करण्याची उत्तम क्षमता असलेले हे श्वान आपत्ती व्यवस्थापन, प्रशिक्षण अशा सगळ्याच कामांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. पूर्वी रोमन साम्राज्यात रॉटवायलर या श्वानांची शक्तिशाली श्वान अशी ओळख होती. रोमन सैन्य एका देशातून दुसऱ्या देशात लढाईसाठी मार्गक्रमण करताना सैन्यासोबत गाई-गुरांचा ताफा असे. या गाई-गुरांच्या कळपाचे रक्षण करण्यासाठी सैन्याकडे रॉटवायलर श्वान बाळगले जात असत. साधारण दोनशे वर्षांपूर्वीचा रोमन साम्राज्यातील रॉटवायलर श्वानांचा इतिहास सापडतो. दक्षिण जर्मनीमध्ये ‘रॉटविल’ असे एका गावाचे नाव आहे. या गावाच्या नावावरून या श्वानांना रॉटवायलर असे नाव पडले. रॉटविल या गावात पशुधन विक्री केंद्रे होती. यासाठी गावात मोठय़ा प्रमाणात बाजारपेठ भरत असे. बाजारपेठेतील प्राण्यांचे, व्यवहार केलेल्या धनाचे रक्षण करण्यासाठी रॉटवायलर श्वानांचा उपयोग होत असे. बाजारपेठेत मिळालेली धनाची पुंजी या श्वानांच्या गळ्यात बांधण्यात येत असे. यामुळे दरोडेखोर, चोरांपासून धनाचे रक्षण होण्यासाठी या श्वानांचा मोठय़ा प्रमाणात उपयोग होत असे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर या श्वानांना जगभरात विशेष मागणी प्राप्त झाली. निर्भय, आत्मविश्वासू, सतर्क अशा विविध गुणवैशिष्टय़ांमुळे इतर श्वानांपेक्षा रॉटवायलर या श्वानांची दहशत आहे. काही व्यक्तींवर हल्ला केल्याच्या घटना घडल्यामुळे रॉटवायलर या जातीबद्दल जनमानसात काही प्रमाणात गैरसमज आहे. मात्र मालकाशी एकनिष्ठ असलेले हे श्वान मालकाच्या रक्षणासाठी कायम तत्पर असतात.
श्वानावर ताबा हवा तर प्रशिक्षणही महत्त्वाचे
रॉटवायलर या जातीच्या श्वानांचा स्वभाव मुळातच अतिशय रागीट असल्याने या श्वानांवर मालकांचा ताबा असणे गरजेचे असते. या श्वानांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असल्याने शत्रूची चाहूल लागताच कोणताही विचार न करता हे श्वान आक्रमकरित्या वागू शकतात. याचसाठी रॉटवायलर श्वानांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते. सर्वात प्रथम आज्ञा पाळण्याची सवय या श्वानांना होणे गरजेचे असते. मालकाने सांगितलेल्या सर्व आज्ञा पाळण्याची सवय असल्यास रॉटवायलर श्वानांवर ताबा ठेवणे सोपे जाते. सुरुवातीच्या काळात या श्वानांची हाताळणी काटेकोर होणे गरजेचे असते. घरात पाळायचे असल्यास या श्वानांना सतत लोकांशी संपर्क, गर्दीच्या ठिकाणी नेणे आवश्यक असते. आजूबाजूला असलेल्या माणसांची या श्वानांना सवय झाल्यास त्यांचा स्वभाव शांत होतो. घरी आलेल्या नवीन पाहुण्यांची ओळख या श्वानांना करून द्यावी लागते. रॉटवायलर या श्वानांना एकटे ठेवल्यास हे श्वान अधिक रागीट होण्याची शक्यता असते. आज्ञा देण्यास, हाताळण्यास मालक कमी पडला तर रॉटवायलर घरात पाळणे कठीण जाते.

रूपाची दहशत
रॉटवायलर हे श्वान पाहता क्षणीच या श्वानांची दहशत वाटत असल्याने चोर, दरोडेखोरांपासून बचाव करण्यासाठी या श्वानांचा उपयोग होतो. कंपन्या, विविध खासगी जागा, निर्जन स्थळी असलेले बंगले येथील सुरक्षेसाठी रॉटवायलर श्वान अधिक उपयोगी पडतात. या श्वानांचे मजबूत शरीर कायम ठेवण्यासाठी इतर श्वानांपेक्षा या श्वानांचा आहार अधिक परिपूर्ण असावा लागतो. कमी दर्जाचे खाद्य या श्वानांच्या वाढीसाठी पोषक ठरत नाही. उत्तम आहार आणि पुरेसा व्यायाम ठेवल्यास रॉटवायलर शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अधिक सक्षम असतात. या श्वानांचे शरीर मुळात मजबूत असल्याने फारसे आजार यांना होत नाहीत. केवळ वय वाढत जाताना वजन वाढल्यास मणक्याचा आजार या श्वानांना उद्भवतो.