‘पेंटेड सॉ टूथ’ हे पिअरीडे म्हणजेच ‘यलो’ आणि ‘व्हाइट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलपाखरांच्या गटातील फुलपाखरू आहे. हे फुलपाखरू म्हणजे स्वत:च्या बचावासाठी दुसऱ्या एखाद्या फुलपाखराची नक्कल करण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. पेंटेड सॉ टूथ हे कॉमन जेझबेल फुलपाखराच्या रूपाची नक्कल करते. कॉमन जेझबेल फुलपाखराच्या शरीरात अळी अवस्थेत, खाद्य झाडांमधून घेतलेली विषारी द्रव्ये साठवलेली असतात. आपल्या या विषाची जाहिरात कॉमन जेझबेल आपल्या अंगावरील भडक अशा लाल-पिवळ्या रंगाने करीत असते. याला घाबरून शत्रू दूर राहतो.

पेंटेड सॉ टूथमध्ये अशा प्रकारे विषारी द्रव्ये साठविण्याची क्षमता नसते. त्यामुळे मग स्वत:च्या बचावासाठी ते कॉमन जेझबेलसारखे दिसण्याचा प्रयत्न करते. काही थोडे फरक वगळता ते त्यात चांगलेच यशस्वी होते. मग भक्षक याला कॉमन जेझबेल समजून त्याच्यापासून लांब राहतात. या प्रकाराला शास्त्रीय भाषेत बास्टेशियन मिमिक्री म्हटले जाते.

या फुलपाखराचे पुढचे आणि मागचे दोन्ही पंख वरच्या बाजूस पिवळसर आणि अनेकदा हिरवट झांक असणारे असतात. पुढच्या पंखांची खालची बाजू लंबगोलाकार पिवळ्या-पांढऱ्या ठिपक्यांची असते. या ठिपक्यांना गडद काळ्या रंगाची किनार असते.

मागच्या पंखांच्या खालच्या बाजूस मोठय़ा लाल ठिपक्यांची एक रांग अगदी बाहेरच्या कडेला असते. त्याच्या आत पिवळ्या लंबगोलाकार ठिपक्यांच्या दोन रांगा असतात. यापैकी सगळ्यात आतल्या रांगेतील ठिपक्यांचा आकार मोठा असतो. शिवाय या ठिपक्यांनाही काळी किनार असते.

या दोन्ही फुलपाखरांतले महत्त्वाचे फरक म्हणजे कॉमन जेझबेलच्या लाल ठिपक्यांना बाहेरच्या बाजूस टोक असते, तर पेंटेड सॉ टूथच्या ठिपक्यांना टोक नसते. शिवाय पेंटेड सॉ टूथचे मागचे पंख जास्त रुंद असतात. हे फुलपाखरू दक्षिण भारतात आणि खासकरून सह्य़ाद्रीमध्ये हमखास सापडते. मोसमी पावसाच्या वनांमध्ये यांचा वावर असतो. यांचे उडणे हे वेगवान आणि चपळ असते.