दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या बहुचर्चित चित्रपटावरुन देशभरात वाद पेटला आहे. राजपूत समाजाच्या कडव्या करणी सेनेने देशभरात या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी धुडगूस घातला. याचाच एक भाग म्हणजे ठाण्यातील कल्याणमध्ये शनिवारी भानुसागर चित्रपटगृहात पद्मावतीचा शो सुरु असताना अचानक बाहेर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. या घटनेत कुठलीही हानी झालेली नाही. पोलीस या प्रकाराची अधिक चौकशी करीत आहेत.

राजपूत संघटनांनी भन्साळीवर पद्मावत चित्रपटातून इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला आहे. मात्र, हा चित्रपट पाहणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, चित्रपटात असे कुठलेही वादग्रस्त चित्रण करण्यात आलेले नाही ज्यामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावतील. दरम्यान, करणी सेनेने शनिवारी सांगितले की, जर त्यांच्याकडे पद्मावत सिनेमाचे हक्क देण्यात आले तर, या चित्रपटाच्या खर्चाची रक्कम द्यायला आम्ही तयार आहोत. तसेच त्यांनी पद्मावत चित्रपटावरून देशभरात झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी घेण्यासही नकार दिला आहे.

करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्रसिंह काल्वी यांनी सांगितले की, त्यांच्या संघटनेतील सदस्यांचा किंवा इतर कुठल्याही अन्य क्षत्रिय संघटनांच्या सदस्यांचा शाळेच्या बसवर केलेल्या हल्ल्यामध्ये कोणाचाही सहभाग नव्हता. बुधवारी हरयाणाच्या गुरुग्राममध्ये २०-२५ शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला झाला होता. चित्रपटाला विरोध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी अनेक वाहनांना आग लावत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले होते.

कल्वींनी सांगितले की, गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या हिंसेमध्ये त्यांच्या संघटनेच्या सदस्यांचे काही देणेघेणे नाही. अहमदाबादच्या एका मॉलबाहेर वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. ही तोडफोड चित्रपटाशी संबंधीत लोकांनीच केल्याच्या उलट्या बोंबाही त्यांनी मारल्या आहेत. कल्वी म्हणाले की, जर या चित्रपटाचे अधिकार आम्हाला मिळाले तर आम्ही पैसे गोळा करुन चित्रपटाचा निर्मिती खर्च त्यांना द्यायला तयार आहोत. मात्र, त्यानंतर आम्ही या चित्रपटाच्या रीळचा जाहीर जौहर करू.