संगणकीय क्लृप्त्या वापरून पेट्रोलच्या ‘मापात पाप’; लाखो ग्राहकांना कोटय़वधींचा गंडाpetrol-1

देशभरातील विविध पेट्रोलपंपातून प्रत्यक्ष खरेदीपेक्षा कमी मापाचे पेट्रोल देऊन ग्राहकांची लुबाडणूक करण्याच्या कटकारस्थानाचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या तावडीत सापडल्यामुळे आता पेट्रोलचोरीसाठी त्याने वापरलेली कार्यपद्धतही समोर येत आहे. ग्राहक तसेच तपास यंत्रणांना संशय येऊ नये यासाठी अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून चार वेगवेगळ्या प्रकारे या टोळ्या पेट्रोलचोऱ्या करत असल्याचे तपासातून समोर आले आहे. या मार्गानी या टोळ्यांनी लाखो ग्राहकांना कोटय़वधी रुपयांचा गंडा घातला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून राज्यभरातील विविध पेट्रोल पंपांवर छापे टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील १६ जिल्ह्य़ांमधील एकूण ९६ पेट्रोल पंपांवर छापे टाकण्यात आले. त्यापैकी ५६ पंपांवर पेट्रोलचोरी होत असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईदरम्यान पंपावरील पेट्रोल चोरीचे चार प्रकार समोर आले आहेत. पेट्रोल पंपांवरून एकूण १९५ पल्सर किट, २२ सेन्सर कार्ड, ७१ कंट्रोल कार्ड आणि ६१ की पॅड जप्त केले आहेत. हे सर्व साहित्य पेट्रोल यंत्र उत्पादित करणाऱ्या कंपन्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मानवी पद्धतीने हाताळले जाणारे पेट्रोल यंत्र २०१० मध्ये कालबाह्य़ झाले आणि त्या जागी इलेक्ट्रॉनिक पेट्रोल यंत्र आले. जेव्हापासून ही यंत्रणा आली, तेव्हापासूनच हा प्रकार सुरूअसल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पेट्रोल यंत्रामध्ये बिघाड झाला असेल तर पंपचालक इंधन कंपन्यांकडे अर्ज करतात. त्यानंतर पेट्रोल यंत्र तयार करणाऱ्या कंपन्यांचे तंत्रज्ञ येऊन यंत्रांची दुरुस्ती करतात आणि वैधमापनशास्त्र विभाग त्याला सील लावते.मात्र, पेट्रोलचोरीसाठी पंपचालकांकडून हा सील काढण्यात येतो आणि त्याजागी बनावट सील लावण्यात येतो. या सीलमधील तारा न कापताही काढता येतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पेट्रोल चोरी नेमकी कशी होते?

पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये ‘पल्सर’ नावाचे उपकरण असते. गोलाकार किंवा अंडाकृती आकाराच्या या उपकरणात ‘मायक्रोचिप’ बसवण्यात आलेल्या असतात. ग्राहकाला किती रुपयांचे पेट्रोल हवे आहे, त्यानुसार कर्मचारी यंत्रावर नोंद करतो. या आकडय़ांच्या आधारे यंत्रांमधून तितक्याच किमतीचे पेट्रोल वितरित करण्यासाठी ही ‘चिप’ उपयुक्त ठरते. मात्र, पेट्रोलचोरी करण्यासाठी या ‘चिप’मध्येच बदल करण्यात येत असे.

पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामधील ‘कंट्रोल पॅनल’मध्येही ‘मायक्रोचिप’ बसविण्यात आलेल्या असतात. ‘पल्सर किट’मधील चिपप्रमाणेच ‘कंट्रोल पॅनल’मधील ‘चिप’चा उपयोग पेट्रोल वितरणासाठी होतो. त्यामुळे या ‘चिप’च्या जागी फेरफार केलेल्या चिप बसवून पेट्रोल चोरी करण्यात येते.

पेट्रोल यंत्रामधील ‘कंट्रोल पॅनल’मध्ये ‘आयसी’ बसविण्यात आलेले असतात. या पॅनलच्या पोर्टला ‘बीफो वायर’च्या साहाय्याने लॅपटॉपशी जोडण्यात येते आणि त्यामध्ये फेरफार केलेले प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर लोड करण्यात येते. हे सॉफ्टवेअर सुरू करण्यासाठी चार अंकी पासवर्ड ठेवण्यात येतो. यंत्रावरील की पॅडवर पासवर्ड टाकून पेट्रोल चोरी केली जाते.

पेट्रोल पंपावरील यंत्रामध्ये चिप बसविण्यात येते आणि तिला रिमोटने जोडण्यात येते. पेट्रोल चोरीसाठी रिमोटच्या साहाय्याने कमांड दिली जाते. त्यानुसार पंपचालक पेट्रोलचोरी करतात.