युवा सेनेच्या उपक्रमाने वाहतूक कोंडी

डोंबिवली : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी डोंबिवलीत युवा सेनेने वाहनचालकांना एक रुपयात पेट्रोल देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे डोंबिवलीसह कल्याण, मुंब्रा, कळवा, बदलापूर परिसरातून वाहनचालक पेट्रोल घेण्यासाठी डोंबिवली एमआयडीसीतील उस्मा पेट्रोलपंपावर आले होते. सकाळी सहा वाजल्यापासून या पेट्रोलपंपावर रांगा लागल्या होत्या.

केवळ २५० चालकांना सुविधेचा लाभ दिला जाणार होता. याबाबत अनेकांना माहिती नव्हते. त्यामुळे पेट्रोलपंपाबाहेर सुमारे ५०० हून अधिक दुचाकी, चार चाकी वाहनचालकांनी गर्दी केली होती. उस्मा पेट्रोलपंप ते पेंढरकर महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोंडीत भर पडली होती.

घरडा सर्कल येथून शिळफाटा रस्ता मार्गे मानपाडा आणि कल्याण येथे जाणारी वाहने कोंडीत अडकून पडली होती. युवा सेनेच्या या कार्यक्रमाबद्दल अनेक ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील तीन महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली पालिका करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत एक रुपयात पेट्रोल देण्याची घोषणा करून युवा सैनिकांनी नाहक गर्दीला आमंत्रण दिले. केंद्र सरकारने पेट्रोलचे दर वाढविले आहेत. त्यामुळे या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाममात्र दरात पेट्रोल उपक्रमाचे आयोजन केले होते, असे युवा सेना नेत्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाममात्र दरात पेट्रोल देण्याचा निर्णय शिवसेना युवा संघटनेने घेतला होता. करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम करण्यात आला आहे.  इंधन दरवाढीचा निषेध या माध्यमातून केला जात आहे.

-राजेश मोरे, शिवसेना नेते, डोंबिवली