डोंबिवली पूर्वेतील फडके रोडला देना बँकेजवळ गटाराचे काम सुरूअसताना कंत्राटदाराच्या चुकीमुळे रस्त्याखालील बीएसएनएलची वाहिनी कामगारांकडून तोडली गेली आणि डोंबिवली स्थानक परिसरातील टेलिफोन आणि इंटरनेट सुविधा दोन दिवस ठप्प झाली होती.

डोंबिवली शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामास पुन्हा सुरुवात झाली आहे. रस्त्याचे काम करण्याअगोदर भूमिगत जलवाहिन्या आणि गटाराची कामे पालिकेकडून करण्यात येत आहे. पूर्वेतील फडके रोडवरील देना बँकेजवळ हे भूमिगत गटाराचे काम सुरूआहे. त्यासाठी येथे खड्डा खोदण्यात आला आहे, परंतु काम करीत असताना कंत्राटदाराच्या चुकीमुळे बीएसएनएलची वाहिनी तोडली गेली, तसेच जलवाहिनीही तुटल्याने स्थानक परिसरातील दूरध्वनी व इंटरनेट सेवा रविवारी सकाळी ठप्प झाली. स्थानक परिसरातील कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालये, सायबर कॅफे, शेअर बाजारात ऑनलाइन उलाढाली करणारी कार्यालय, देना बँक  यांना ही सुविधा बंद पडल्याचा मोठा फटका सोमवारी बसला.  ‘फडके रोड हा रहदारीचा रस्ता असल्याने दिवसभर काम करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे कंत्राटदाराने रात्री काम करण्यास सांगितले व रात्रीच्या वेळेस कामगारांकडून ही वायर तुटली,’ असा खुलासा कंत्राटदाराच्या वतीने करण्यात आला. मात्र याठिकाणची जलवाहिनीही तुटल्याने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीचे काम रविवारी करता आले नाही. सोमवारी त्यांनी पालिकेला पाणी बंद करण्याविषयीचे निवेदन दिले. त्यानंतर तेथील बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी लाइन दुरुस्त करून अखेर मंगळवारी दुपारी ही सुविधा पूर्ववत सुरूझाली. यामुळे आधीच दूरध्वनींचा वापर कमी होत असताना सेवा बंद राहिल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.