ठाणे महानगरपालिका आणि फोटो सर्कलच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार छायाचित्र स्पर्धा नुकतीच ठाण्यातील कलाभवन येथे पार पडली. यानिमित्ताने स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या आणि विजेत्यांच्या काही छायाचित्रांचे प्रदर्शन कला भवन येथे भरवण्यात आले होते. मोनोक्रोम, निसर्ग, वाइल्ड लाइफ, प्रवासाचे प्रकाशचित्रण आणि भारतातील रस्त्यावरील जीवन या विषयावर राज्यभरातील छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा आविष्कार या प्रदर्शनात ठाणेकरांना अनुभवायला मिळाला.
महानगरपालिका आणि फोटो सर्कलच्या साहाय्याने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे आविष्कार स्पर्धेचे हे १७वे वर्ष असून अकोला, चंद्रपूर, नाशिक, रत्नागिरी, मुंबई येथील छायाचित्रकार या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रदर्शनात असलेल्या वाइल्ड लाइफ विषयावरील छायाचित्रांमध्ये ‘भक्ष्य पकडणारी पक्षीण’, ‘पाण्याबाहेर डोकावणारा वाघ’ तर रस्त्यावरील आयुष्य रेखाटणारे ‘डोंबाऱ्या मुलीचे छायाचित्र’ , निसर्गचित्रण करणारे बर्फात उगवलेले झाड, वाहनातील आरशात स्वत:ला न्याहाळणारी रस्त्यावरील लहान मुलगी अशा छायाचित्रांचा समावेश प्रदर्शनात होता.
ठाण्यातील सौरभ चाफेकर यांचे पदपथावर झोपलेल्या व्यक्तीच्या हातातील स्मार्टफोन आणि त्याचा गुगलचा शोध हे छायाचित्र परिस्थितीचे उपरोधक वर्णन करणारे होते. छायाचित्रकार केदार भिडे आणि राज ललवानी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. ११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आणि प्रदर्शनात रंग, मोनोक्रोम आणि निसर्ग, जंगलातील जीवन हे विषय तसेच ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सण आणि उत्सव असे विषय ठरवण्यात आले आहेत. रविवारी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महापौर संजय मोरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

संपूर्ण स्पर्धेचे आयोजन उत्तमरीत्या केले गेले. अनेक वरिष्ठ छायाचित्रकारांसोबत नवोदित छायाचित्रकारांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. स्पर्धेचे खुले परीक्षण असल्याने स्पर्धकांच्या मनात संभ्रम राहिला नाही.
– नेहा मांडलेकर, ठाणे (विजेती स्पर्धक)