कल्याण- डोंबिवलीतील अनेक अरुंद रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे शहरातील रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे हे रस्ते मोकळे आणि रुंद व्हावे अशी येथील नागरिकांची गेली अनेक वर्षांची मागणी होती. अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी गेल्या काही दिवसांत शहरांतील अतिक्रमणे तसेच फेरीवाल्यांविरोधात कडक मोहीम हाती घेत हे रस्ते रुंद करण्याची कामे सुरू केली आहेत. कल्याणच्या शिवाजी चौकाकडे जाणारा रस्ता रुंद करण्यात आला आहे. याशिवाय गोविंदवाडी बायपास या रस्त्यामधील अडथळेही दूर करून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याचप्रमाणे कल्याणमधील कोर्ट परिसरातील मोहम्मद अली रस्त्यावरील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नाराज झालेले व्यापारी, राजकीय नेते आयुक्तांच्या विरोधात मोर्चेबांधणी करीत असले तरी रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने नागरिक मात्र आयुक्तांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.