ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर शहरांतील रस्त्यांवर पुन्हा खड्डे

ठाणे : पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा प्रशासनाचा दावा गेल्या आठवडय़ात कोसळलेल्या मुसळधार पावसाने फोल ठरवला आहे. ठाणे शहरातील घोडबंदर येथील मुख्य रस्ते, सेवा रस्ता, तीन पेट्रोल पंप उड्डाणपूल या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

घोडबंदर मार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अख्यारीत होता. सेवा रस्ते महापालिकेकडे आहेत. गायमुख येथील परिसरातील टोलनाका मार्च महिन्यात बंद झाला आहे. त्यामुळे मुख्य रस्ता आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाने केला, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना याबाबत विचारले असता त्यांनी आमच्या अख्यारीत हा रस्ता नसून तो राज्य रस्ते विकास महामंडळाकडेच असल्याचे सांगितले. त्यामुळे घोडबंदर मार्ग नेमका कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

भिवंडी शहरातही कशेळी, काल्हेर, राजीव गांधी उड्डाणपूल परिसर, पूर्णा, अंजूरफाटा या भागांतही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कशेळी, काल्हेर भागांतून अवजड वाहनांची वाहतूकही मोठय़ा प्रमाणात होत असते. मेट्रोची कामेही या मार्गावर सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बदलापूर येथे नगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील उड्डाणपुलावर, कल्याण-डोंबिवलीतील काही रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत.

ठाण्यात कोणत्या रस्त्यांवर खड्डे?

  • नवे ठाणे म्हणून ओळख असलेल्या घोडबंदर मार्गावर सर्वाधिक खड्डे आढळून येत आहेत. कापूरबावडी, विजय गार्डन, कासारवडवली, आनंदनगर, ओवळा, तत्त्वज्ञान विद्यापीठ, विहंग हॉटेल परिसरांत खड्डे पडले आहेत. ’ कासारवडवली, ओवळा, गायमुख भागांतील सेवा रस्त्यांची कामे अजूनही पूर्ण नाहीत. त्यामुळे अनेकदा या भागात कोंडी होते.
  • पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपुलाच्या पायथ्याशी खड्डे पडले आहे.
  • पाचपाखाडी येथील धर्मवीर नगर ते तीन हात नाका सेवा रस्ता, कोरम मॉलसमोरील सेवा रस्ता, तीन पेट्रोल पंप उड्डाणपूल, खोपट सिग्नल परिसर, वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळील बसथांबा या ठिकाणचे रस्ते पावसामुळे उखडले आहेत.
  • घोडबंदर रोडवरील सेवा रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जाणार आहे. शहरात पडलेल्या खड्डय़ांचीही माहिती घेण्यात येत असून तेथील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.

– रवींद्र खडताळे, नगर अभियंता, ठाणे महापालिका.