निवडणुकीच्या नावाखाली दीड महिने पालिकेच्या ताब्यात

निवृत्तीनंतरच्या आयुष्यातले काही क्षण तरी आनंदात जावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राचा मोठाच आधार असतो. मीरा-भाईंदर महापालिकेने शहरात ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र्रे सुरूही केली आहेत, परंतु निवडणुकीच्या नावाखाली दीड महिन्यांपासून मीरा रोड येथील विरंगुळा केंद्राचा महापालिकेने ताबा घेतल्याने ज्येष्ठ नागरिक मात्र हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडे याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नागरिक करत आहेत, परंतु त्यांना दादच लागू दिली जात नाही.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेने भाईंदर पश्चिम, भाईंदर पूर्व आणि मीरा रोड येथे विरंगुळा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांचा ताबा महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांकडेच दिला आहे. मीरा रोड येथेली रामनगर या महापालिकेच्या इमारतीमधील तळमजल्याचा सुमारे दीड हजार चौरस फुटांचा हॉल महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करून दिला. ज्येष्ठ नागरिक संघटना मीरा रोड या नोंदणीकृत संस्थेकडे त्याचा ताबा दिला. प्रशासनाने संस्थेशी करारनामा केला असून त्याचे वेळोवेळी नूतनीकरण केले जाते. संस्थेकडून वरिष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात असल्याने वरिष्ठ नागरिकांना मीरा रोडमध्ये चांगलीच सुविधा उपलब्ध झाली आहे, परंतु गेल्या दीड महिन्यापासून या विरंगुळा केंद्राचा ताबा महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या कामासाठी रामनगरमधील विरंगुळा केंद्र प्रशासनाने ताब्यात घेतले. त्यातील संघटनेचे सामानही बाहेर काढून व्हरांडय़ात ठेवले. आता निवडणूक संपून तब्बल दहा दिवस उलटले तरी हे विरंगुळा केंद्र पुन्हा वरिष्ठ नागरिकांच्या ताब्यात देण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. परिणामी केंद्रात येणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

पूर्वसूचना न देता ताबा

२०१३ पासून ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या ताब्यात असलेल्या या विरंगुळा केंद्रात पालिकेने खुच्र्या, टेबल, दूरदर्शन संच, वर्तमानपत्रे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संघटनेने स्वत: या ठिकाणी वाचनालय सुरू केले. खेळाचे सामान आणि संगीत उपकरणे आणली. संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवडय़ातील प्रत्येक दिवशी काही ना काही उपक्रम राबवले जातात, परंतु गेल्या दीड महिन्यापासून हे सर्व उपक्रम केंद्र महापालिकेच्या ताब्यात असल्याने बंद पडले आहेत. पालिकेसोबत झालेल्या करारात हवे तेव्हा पालिकेला केंद्र उपलब्ध करून देण्याची अट आहे. प्रत्येक वेळी महापालिका गरज असेल तेव्हा आगाऊ सूचना देऊन केंद्र ताब्यात घेते, परंतु निवडणुकीच्या कामासाठी कोणतीही पूर्वसूचना न देताच प्रशासनाने केंद्र ताब्यात घेतले आहे.

रामनगर येथील इमारतीत अन्य जागा मोकळ्या असतानाही केवळ विरंगुळा केंद्राची जागाच निवडणुकीच्या कामासाठी घेण्यामागचा प्रशासनाचा उद्देश न समजण्यासारखा आहे. निवडणुका संपून आता दहा दिवस उलटले तरी विरंगुळा केंद्रात निवडणुकीसाठी नेमलेल्या कंत्राटदाराचे सामान तसेच पडून आहे. प्रभाग अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केल्यानंतरही केंद्राचा ताबा संघटनेकडे दिला जात नाही.    – अरविंद भोसले, सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघटना