News Flash

पुलांखाली व्यायामाचा ‘योग’

सुरक्षेकडे बोट दाखवत उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांखाली वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे.

योग केंद्र, सायकल मार्गिका, उद्यानांची निर्मिती

ठाणे शहरातील उड्डाणपुलांखाली होत असलेले अतिक्रमण आणि अनधिकृत उद्योग यांचा कायमचा बंदोबस्त करून त्या मोकळ्या जागांचा वापर सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच घोडबंदर परिसरातील उड्डाणपुलांखाली लवकरच योग केंद्र, जॉगिंग तसेच सायकल मार्गिका आणि उद्याने उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याच धर्तीवर मानपाडा येथील पुलाखाली तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन येत्या दोन दिवसांत होणार असून नितीन कंपनी परिसरातही एक सायकल मार्गिका तयार करण्यात येत आहे.

सुरक्षेकडे बोट दाखवत उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांखाली वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे. मात्र, मुंबई, ठाण्यातील महत्त्वाच्या पुलांखाली अजूनही वाहने उभी करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने या जागांचा आता नागरिकांच्या सुविधेसाठी वापर करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी उड्डाणपुलाखाली असलेल्या जागाही महापालिकेने मध्यंतरी रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करून घेतल्या. आता याच ठिकाणी खासगी लोकसहभागातून विविध प्रकल्प उभे केले जात आहेत, असे या कामाचे ठेकेदार आणि ‘रोनक’ या जाहिरात कंपनीचे अधिकारी हृषीकेश डोळे यांनी सांगितले.

ठाण्यातील मानपाडा, वाघबीळ उड्डाणपुलाखाली असलेल्या जागेचे सुशोभीकरण झाले असून नितीन कंपनी येथील भागात सायकल मार्गिका तयार करण्यात येत आहे. मानपाडा येथील उद्यान दोन दिवसांत खुले होईल, असे पालिकेतील    सूत्रांनी सांगितले. अशाच प्रकारे माजिवडा उड्डाणपुलाखाली उद्यान, जॉगिंग ट्रॅक तसेच सायकल ट्रॅकची उभारणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

ही उद्याने व अन्य सुविधा नागरिकांना मोफत वापरता येतील. जाहिरात अधिकाराच्या बदल्यात ठेकेदाराकडून ही कामे करून घेण्यात आली आहेत.

अशा प्रकारे उद्याने उभी राहिल्याने उड्डाणपुलाखालील गर्दुल्ल्यांचा वावर, झोपडय़ा, तसेच अनधिकृत वाहने उभी राहण्यासही बंदी होईल, असे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.

पुलाखालच्या जागेचा कायापालट

नितीन कंपनी उड्डाणपुलाखाली असलेल्या जागेत यापूर्वी गर्दुल्ल्यांचा वावर असे. या ठिकाणी वाहने बेकायदा उभी केली जात असत. मात्र, पालिकेने ही जागा ताब्यात घेऊन उद्यान उभारणी सुरू केली आहे. या ठिकाणी ७०० मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येत असून या पुलालगतच्या पदपथावर हरित पथ बनवण्यात येत आहे. येथून जवळच योग केंद्र बनवण्यात येत असून तेथे एकाच वेळी १०० ते १२० जण योग करू शकतील, इतकी जागा पुरवण्यात येणार आहे. या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी जाळी (नेट) बसवण्यात येत आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामबाके, लहानग्यांसाठी क्रीडा साधने येथे उभारण्यात येत आहेत. उड्डाणपुलाच्या खांबाना रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच या खांबावर रात्री रंगीबेरंगी लाइट्स सोडण्यात येत असल्याने रात्रीच्या वेळी ही जागा अधिक आकर्षित दिसणार आहे. येत्या दीड महिन्यात नागरिकांसाठी हे उद्यान खुले होणार आहे. या सगळ्या सेवा रहिवाशांना मोफत उपलब्ध होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:58 am

Web Title: place under flyover will be used for public facilities in thane
Next Stories
1 टोमॅटोची शंभरी!
2 शाखाप्रमुख व्हायचे आहे.. गुन्हे करा!
3 विद्युत वाहनांसाठी सज्जता!
Just Now!
X