अंबरनाथमधून १७.५ किमी लांबीची वाहिनी
प्रशांत मोरे, सागर नरेकर
ठाणे : रासायनिक सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने प्रदूषित झालेल्या उल्हास आणि वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अखेर पावले उचलली आहे. अंबरनाथ येथील औद्योगिक वसाहतीतील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर येथे प्रक्रिया होणारे रासायनिक सांडपाणी थेट कल्याण खाडीपात्रात सोडण्याची योजना मंडळाने आखली आहे. यासाठी अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका ते थेट कल्याण-वसई खाडी अशी १७.५ किलोमीटर लांबीची वाहिनी टाकण्यात येणार आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर येथील औद्योगिक विभागातील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सदोष आहेत. अंबरनाथ येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीतील केंद्र तर गेली काही वर्षे बंदच होते. आता ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. दरम्यानच्या काळात या परिसरातील काही कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट नदीपात्रात सोडतात किंवा कंपनीच्या आवारात खड्डा खोदून ते जमिनीत मुरवीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे श्री मलंग डोंगरपट्टय़ात उगम पावून कल्याण खाडीला मिळणाऱ्या वालधुनी नदीची अवस्था सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठय़ा नाल्यासारखी झाली आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी
नागरिकांकडून वारंवार येत असल्याची दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आता हे सांडपाणी प्रक्रिया करून खाडीपात्रात सोडण्यासाठी योजना आखली आहे.
अंबरनाथ, उल्हासनगरमधील शांतीनगर, सेंच्युरी केमिकल कंपनीच्या बाजूने वालधुनी नदीपात्राशेजारून पुढे उल्हास-काळूनदीचा संगम ते थेट उंबर्डे भागापर्यंत ही वाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सुमारे ७४ कोटी ६२ लाख २० हजार ९७० रुपयांच्या या कामासाठी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यात अंबरनाथ औद्योगिक वसाहत भागातील फॉरेस्ट नाका येथे अस्तित्वात असलेल्या केंद्रापासून ते उल्हास खाडीपर्यंत प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी वाहून नेले जाणार आहे.
वाहिनी फुटण्याचे प्रकार
बदलापूर औद्योगिकवसाहतीतून प्रक्रिया केलेले सांडपाणी सध्या अंबरनाथ येथील केंद्रात आणले जाते. त्यासाठीही अशाच प्रकारे वाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र ही वाहिनी सातत्याने फुटत असल्याने आसपासच्या भागात रासायनिक सांडपाणी वाहते. त्यामुळे दुर्गंधी आणि इतर त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 22, 2018 1:42 am