भिवंडी शहरामध्येच एकूण ४०० खाटांच्या रुग्णालयाचे नियोजन

कल्याण- करोना रुग्णांची वाढती संख्या आणि पावसाळ्यातील इतर साथीच्या आजारांचा विचार करून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने भिवंडीजवळील काही गोदामे ताब्यात घेऊन करोना रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या रुग्णांमधील व्यवस्था उभी करण्यात तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन महापालिकेने हा प्रस्ताव तूर्तास गुंडाळला असल्याची माहिती आहे.

या ठिकाणी तीन पाळ्यांमध्ये काम करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणाऱ्या अडचणी, पावसाळ्यात मुसळधार पाऊस सुरू असेल तर या कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यात होणारी अव्यवस्था असे प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव गुंडाळला असल्याचे वृत्त आहे.

कल्याण, डोंबिवली शहरातील लहानमोठय़ा जागा ताब्यात घेऊन तेथे करोना रुग्णालय सुरू करण्याऐवजी भिवंडीजवळील गोदामे ताब्यात घेऊन तेथे दोन ते तीन हजार खाटांचे करोना रुग्णालय एकाच जागेत सुरू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता. काही दिवसांपूर्वी ‘म्हाडा’, पालिका अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या गोदामांची पाहणी केली होती. या वेळी काही गोदाम मालकांनी ‘आम्ही गोदामे यापूर्वीच भाडय़ाने दिली आहेत. टाळेबंदीमुळे ती बंद आहेत. या गोदामांचे भाडे आम्हाला सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी आमच्या परवानगीशिवाय रुग्णालय कसे सुरू करता’, असे प्रश्न उपस्थित केले होते. बहुतांश गोदाम मालक स्थानिक भूमिपूत्र आहेत. भिवंडी परिसरातील गावे करोना रुग्णमुक्त आहेत. शहरातील रुग्ण येथे आणून तुम्ही या भागात करोनाचा फैलाव करू नका, असे या भागातील ग्रामस्थांनी विरोध करताना अधिकाऱ्यांना सांगितले. गावकरी, गोदाम मालकांनी विरोध केल्याने अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला.

व्यवस्था उभी करण्यात अडचणी

गोदामाच्या पाहणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी कल्याण, डोंबिवलीपासून ही रुग्णालये १५ किलोमीटर दूर आहेत. येणारा काळ पावसाचा आहे. या आडवळणी भागात तीन पाळ्यांमध्ये काम करणारे डॉक्टर, परिचारिका, कक्ष परिचर कर्मचारी उपलब्ध होण्यात अडचणी येणार. यासाठी स्वतंत्र वाहनांचे नियोजन पालिकेकडे आहे का, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. गंभीर रुग्ण लांब अंतरावर आणताना मध्येच काही त्या रुग्णाला झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार तसेच मुसळधार पाउस असेल तर रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका कशा येथपर्यंत पोहोचणार असे प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांनी म्हाडा, पालिका अधिकारी निरुत्तर झाले. दीड हजार ते दोन हजार रुग्ण, १५० ते २०० कर्मचाऱ्यांचा ताफा त्यांची आसन, भोजन व्यवस्था. स्वच्छतागृह कशी उभारणार. पालिकेने मल प्रक्रिया केंद्र उभारण्याची सूचना केली होती. त्यापेक्षा शोष खड्डा तयार करून त्यावर तेथेच प्रक्रिया करुन ते मलपाणी आडवळणी भागात टाकण्याची सूचना म्हाडा अधिकाऱ्यांनी केली.

प्रस्ताव तूर्तास स्थगित

वैद्यकीय, स्वच्छता, रुग्ण, कर्मचारी वाहतूक, शहरापासूनचे लांब अंतर विचारात घेऊन सध्या तरी पालिका प्रशासनाने भिवंडीजवळील गोदामांमध्ये करोना रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव मागे ठेवला असल्याचे कळते. या ठिकाणी रुग्णालय सुरूच करायचे असेल तर म्हाडा, एमएमआरडीएच्या माध्यमातून शासन त्यांच्या नियोजनाप्रमाणे प्रयत्न करील, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

करोना रुग्ण, सामान्य आजाराचे, प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांवर तत्पर वैद्यकीय उपचार केले जातील अशी व्यवस्था प्रशासनाने रुग्णालयांमध्ये केली आहे. पावसाळ्यातील साथ आजाराचा विचार करून तापाचे दवाखाने सुरूच राहतील. वैद्यकीय सर्व अद्ययावत सुविधा करोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिल्यात. कोणत्याही वर्गातील एकही रुग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचित राहता कामा नये असे नियोजन प्रशासनाने केले आहे.

– विनिता राणे, महापौर

भिवंडीत ५०० खाटांचे संस्थात्मक अलगीकरण केंद्र

ठाणे : करोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून भिवंडीत येणाऱ्या नागरिकांचे अलगीकरण करण्यासाठी ५०० खाटांचे संस्थात्मक अलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय मंगळवारी भिवंडी महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार भिवंडीतील चार सभागृहांत हे केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

भिवंडीत करोना रुग्णांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. भिवंडी महापालिका प्रशासनाने टाटा आमंत्रा अलगीकरण कक्ष येथे ‘कोविड केअर सेंटर’ उभारलेले आहे. त्यामुळे करोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचे तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून भिवंडीत येणाऱ्यांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यासाठी संस्थात्मक अलगीकरण केंद्राची उभारणी करणे आवश्यक होते. त्यानुसार, भिवंडीतील कै. परशराम टावरे मैदान येथील खुदा बक्ष सभागृहात २००, मिल्लतनगर येथील फरहान सभागृह, कोंबडपाडा येथील गाजेंगी सभागृह आणि वऱ्हाळदेवी सभागृहात प्रत्येकी १०० अशा एकूण ५०० खाटांचे संस्थात्मक अलगीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.