हेमंत साने यांचे प्रतिपादन
इस्रायमधले कोणतेही झाड नैसर्गिक उगवलेले नाही, तर त्या देशातील प्रत्येक झाडाचे रोपण केलेले आहे. तेथील सुजाण नागरिक झाडाचे प्रत्येक पान जपतात. रोपटय़ांना लहान मुलांसारखे वाढवतात. तेथील लोकांनी गरज नसताना पाने फुले तोडायची नाहीत, अशी ऐच्छिक बंदी घालून घेतली आहे. त्यामुळेच इस्राईल देशाने प्रगती साधली आहे, असे वक्तव्य हेमंत साने यांनी केले.
पर्यावरण आणि पर्यटन या दोन्ही घटकांविषयी प्रचंड आस्था बाळगणाऱ्या डोंबिवलीतील विविसू डेहरा, या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या संस्थेने ‘जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारू स्वच्छंद’ या उपक्रमात ‘इस्रायलवर बोलू काही’ या कार्यक्रमाचे करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते. विभाकर शिंत्रे या शब्दसफारीमध्ये हेमंत साने यांच्याशी संवाद साधला. हेमंत साने यांनी विद्यार्थी आणि उपस्थितांना त्यांच्या इस्रायल सफरीचा अनुभव सांगितला. तेथील लोक पाण्याचा एकही थेंब वाया न घालवता, त्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी कसा करतात. तसेच वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर देशाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाला ३ वर्षे सैनिकी शिक्षण घेणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर नोकरी करीत असताना वर्षांतून १ महिना सैन्य दलात आपली सेवा देणे हे नुसते आवश्यक नव्हे तर कर्तव्य आहे. हेवा वाटावा अशी सुबत्ता त्यांनी कृषिक्षेत्रात प्राप्त केली आहे. त्यांच्या शेतातील वांगी, पडवळ लांब असतात, द्राक्षाचे घड दीड फूट लांब तर कलिंगड भोपळ्याएवढे मोठे असतात आदी गोष्टी साने यांनी यावेळी सांगितल्या.
इस्रायलने वैद्यकीय क्षेत्रात अमेरिकेच्या बरोबरीने प्रगती केली आहे. त्यांचे युद्धसामग्री, रडार याचे तंत्रज्ञान जगाला आश्चर्य करावयास लावेल, असे आहे. तेथील प्रत्येक नोकरदार आणि व्यावसायिकाच्या मिळकतीतून दरमहा १०% रक्कम राष्ट्रीय विमा योजनेत जमा करण्यात येते. त्यातील ४.७५% रक्कम आरोग्यविम्याकडे जाते. प्रत्येक नागरिकाला त्यातून आजारपणासाठी व उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात येते. उर्वरित रकमेचा विनियोग अपंग, गरोदर स्त्रिया व वृद्धापकाळाकरिता केला जातो, तसेच यातून बेकार भत्तासुद्धा देण्यात येतो.