करोनाच्या संकटामुळे यंदा वनीकरणाला स्थगिती

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : करोनाच्या संकटामुळे वसई-विरार महापालिकेच्या वनीकरणाच्या चौथ्या टप्प्याला स्थगिती मिळाली आहे. या टप्प्यात ५० हजार वृक्षरोपे लावली जाणार होती. करोनाचे संकट निवारण करण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याने या ‘हिरव्या मोहिमे’ला लाल कंदील लागला आहे.

वसई-विरार महापालिकेने २०१७ पासून शहरात कृत्रिम जंगल विकसित करण्याची महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली होती. महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि वनविभागाच्या सहकार्याने पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने शहर परिसरात वनीकरण करणे सुरू केले होते. विरारमधील शिरगाव, गास, कोपरी नारिंगी, चंदनसार, कणेर, विरार, नालासोपारा येथील बिलालपाडा, धानीव, पेल्हार ही ठिकाणे कृत्रिम जंगल तयार करून त्याठिकाणी पर्यटनस्थळ, जंगल पर्यटन, पक्षीअधिवास, हरीण अभयारण्य, औषधी वनस्पती उद्याने विकसित करण्याची योजना आहे.

आतापर्यंत गेल्या तीन वर्षांत वनीकरणाचे तीन टप्पे महापालिकेने पूर्ण केले होते. त्याअंतर्गत तीन लाखांहून अधिक वृक्षरोपे लावली होती. त्यातील ९० टक्के वृक्ष जगल्याचे पालिकने सांगितले. यंदा मात्र संपूर्ण लक्ष करोनावर असल्याने यावर्षी ही मोहीम सुरू होणार नसल्याचे पालिकेने सांगितले. यंदा करोनाच्या संकटामुळे पालिकेने ही मोहीम अद्याप सुरू केलेली नाही. सध्या आमचे सगळे लक्ष करोनाच्या साथीला आटोक्यात आणणे, रुग्णांना उपचार मिळवून देणे यांवर असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. पाच वर्षांत कृत्रिम जंगल तयार करून शहरात पर्यटनस्थळ विकसित करण्याबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. त्यामुळे हा प्रकल्प आता एक वर्ष लांबणीवर गेला आहे.

सामाजिक संस्थांमार्फत मोहीम राबवण्याची मागणी

करोना संकट निवारण्यासाठी पालिकेने वनीकरणाच्या चौथ्या टप्प्याला स्थगिती दिली आहे. यात चुकीचे काही नाही, असे मत माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस यांनी व्यक्त केले आहे. मात्र पालिकेने सामाजिक संस्थाच्या मार्फत शहरातील वनीकरण मोहीम सुरू ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अनेक सामाजिक संस्था काम करतात. त्यांना पालिकेने सबसिडी द्यावी, अशी मागणीही घोन्साल्विस यांनी केली आहे.